“हिंदू हाच देशाचा केंद्रबिंदू!” – मिलिंद परांडे

0
4

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) : “हिंदू हाच देशाचा केंद्रबिंदू असून हिंदुत्व समाजाच्या केंद्रस्थानी आहे!” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी केले. विश्व हिंदू परिषद, पिंपरी चिंचवड जिल्हा – विशेष संपर्क विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद सेतू या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिलिंद परांडे बोलत होते. प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, इस्कॉनचे गोपीदास प्रभू, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सम्पर्क प्रमुख श्रीकांत पोतनीस यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

मिलिंद परांडे पुढे म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा हा काळ हिंदू समाजासाठी अनुकूल आहे. जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व वाढले आहे. रामजन्मभूमी आंदोलनापूर्वी हिंदूंना स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात न्यूनगंड वाटत होता; परंतु आंदोलनाच्या यशानंतर परिस्थिती पालटली आहे. २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसर्‍या क्रमांकावर येण्याची सुचिन्हे दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विश्वात भारत अग्रेसर होऊ नये म्हणून अनेक परकीय आणि देशांतर्गत शक्ती प्रयत्नशील आहेत. जागतिक महाशक्ती जगात सर्वत्र कळसूत्री सरकारे असावीत अशी इच्छा बाळगून आहे किंबहुना बांगलादेशाप्रमाणे भारताची दुर्दशा व्हावी असेच कुटिल डाव खेळले जात आहेत. यासाठी अशांती, सांस्कृतिक मार्क्सवाद, भोगवाद बोकाळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या आव्हानांचा सामना करताना आपल्या हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. श्रेष्ठ तत्त्वज्ञान अन् भ्रष्ट आचरण ही हिंदू समाजाची शोकांतिका आहे. सुसंस्कारांची कमतरता हे त्यातील प्रमुख कारण आहे. हिंदूंचा घटता जननदर, मोठ्या प्रमाणावर झालेले धर्मांतरण, स्त्रीला देवत्व बहाल करणे पण प्रत्यक्षात कौटुंबिक पातळीवर दुय्यम वागणूक या बाबतीत अंतर्मुख होऊन कृतिशील होणे गरजेचे आहे. देव, देश आणि धर्म याच्या पुनरुत्थानासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केल्यास हिंदुस्थान वैभवाच्या शिखरावर जाऊन पोहोचेल!” असा आशावाद मांडत रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेने परांडे यांनी समारोप केला.

दीपप्रज्वलन आणि अखंड भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रीकांत पोतनीस यांनी प्रास्ताविकातून समाजात प्रभाव असलेल्या उच्चशिक्षित वर्गाला समाजातील समस्या आणि आव्हाने यांचे आकलन व्हावे म्हणून विश्व हिंदू परिषद कार्यरत असल्याची माहिती दिली. कार्यकम नियोजन डॉ. शर्वरी यरगट्टीकर, शारदा रिकामे, नितीन वाटकर, विजय रामाणी, रवी कळंबकर, प्रांत मंत्री विजय देशपांडे, भास्कर रिकामे यांनी केले. विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री धनंजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा सहमंत्री विशाल मासुळकर यांनी आभार मानले.