देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित?; मनोज जरांगें म्हणाले…

0
3

मुंबई, दि. 25 (पीसीबी) : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. उद्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असं वाटतं? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विचारलं विचारण्यात आला. तेव्हा आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे? आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. 70-75 वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.

आमची जात आणि आमचे लेकरं बाळ मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असं आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्हाला लढावं लागलं असतं हे पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे. सत्ता, सत्ता असते. त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत. त्याचे आम्हाला काही वाटत नाही. सासु जरा खंदूशी असल्यासारखी आहे, आणि सासुला जनता बरोबर ठेप्यावर आणते, अशा शब्दात जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठ्यांनी त्यांना पाच वर्षे हाताळला आहे. त्यामुळे हाताळणे काही अवघड नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाले काय…? नाही झाले काय…? त्याचे आम्हाला कुठलेही सोयरं सुतक नाही. आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधीही झाले नसेल असे भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे, आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले आहे. आता मोठा लढा उभा करायचा आहे, असं जरांगे म्हणाले.