ईव्हीएमच्या विरोधात कोण मोर्चा काढण्याच्या तयारीत; कोण कोण याचिका दाखल करणार

0
8

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आला. या निकालात महायुतीला भरघोस यश मिळाले. भाजपच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले. महायुतीच्या या विजयानंतर आता ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत येत आहे. पराभूत झालेले उमेदवार आणि काही ज्येष्ठ विधिज्ञ या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. महायुतीच्या या विजयानंतर निवडणूक निकालाला आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया एडवोकेट असीम सरोदे यांनी दिली आहे. मतदान करणे जसे मतदारांचा अधिकार आहे. तसेच आपण केलेले मतदान कोणाला गेला आहे, हे जाणून घेण्याचा सुद्धा अधिकार लोकशाहीत आहे. त्यामुळे आता आम्ही या निवडणूक निकालाला आव्हान देणार असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

अ‍ॅड असीम सरोदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा लागलेला हा निकाल अनाकलनीय आणि अविश्वसनीय स्वरूपाचा आहे. एवढे राक्षसी बहुमत महायुतीला जाणे अशक्य आहे. आता सगळे शंकास्पद वाटत आहे. लोक कोणाला मतदान करतात आणि ते कोणाला मिळत आहे. या निकालाच्या विरोधात अनेक लोकांनी न्यायालयात जायचे ठरवले आहे. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी मला संपर्क केला आहे. तसेच आता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे पराभूत उमेदवार आहे. या सर्वांनी याचिका दाखल केली पाहिजे. उमेदवार नाही तर मतदार देखील निवडणूक चॅलेंज करू शकतो. मतदारांनी देखील ही निवडणूक चॅलेंज केली पाहिजे. यंत्रणांचे शुद्धीकरण आपण न्यायालयात जाऊनच करू शकतो, असे सरोदे यांनी सांगितले.

मनसेचे नेते दिलीप धोत्रे ईव्हीएमच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहे. दिलीप धोत्रे यांनी एव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा आरोप केला. व्हीव्हीपॅटच्या स्लिपची फेर मोजणी करावी, अशी काल केलेली मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायलायात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू ईव्हीएम विरोधात 26 नोव्हेंबरला लाँग मार्च मोर्चा काढणार होते. चांदुर बाजार ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा लाँग मार्च काढणार होते. परंतु तूर्तास हा मोर्चा स्थगित केला आहे. भाजपाने ईव्हीएम मॅनेज करून निवडणूक जिंकल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. मोर्चा काढण्यापूर्वी संवैधानिक मार्गाचा अवलंब करू व त्यानंतर रस्त्यावरची लढाई करू, असे त्यांनी सांगितले.