भोसरी, दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्रात अत्यंत चुरशीचा सामना भोसरी विधानसभा मतदारसंघात रंगला होता. जिंकणार कोण त्याचा निकाल शनिवारी येणार आहे मात्र, त्याच्या आत कार्यकर्त्यानी आमदार महेश लांडगे यांची हॉट्रिक घोषित करत बॅनर लावले आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच आमदार महेश लांडगे यांच्या विजयाचे फलक त्यांच्या समर्थकांनी लावले आहेत. निवडणुकीचा निकाल उद्या शनिवार (दि.२३) रोजी लागणार असून त्यापूर्वीच भोसरी परिसरातील साने चौक, थरमॅक्स चौक, आकुर्डी या भागात त्यांचे समर्थक सौ.किर्ती मारुती जाधव यांनी ही फलकबाजी केली असून याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेश लांडगे विरुद्ध महाविकास अजित गव्हाणे असा सामना रंगला आहे. महायुतीकडून महेश लांडगे यांची उमेदवारी निश्चित होती. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात आलेले अजित गव्हाणे यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली. दोन्ही उमेदवारांनी भोसरी विधानसभा मतदारसंघ प्रचार करत असताना चांगलाच पिंजून काढत चांगलीच रंगत निर्माण केली आहे.
अजित गव्हाणे यांच्यासाठी शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी ताकद लावली होती. तर महेश लांडगे यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी मोठी ताकद लावली आहे. परंतु, निकालाआधीच उत्साही कार्यकर्त्यांनी महेश लांडगे यांचे आमदार म्हणून फ्लेक्स लावल्याने चर्चा सुरू झाली आहे.