पिंपळे निलख येथे मतदान केंद्रात मोबाईल नेणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

0
6

सांगवी, दि. २१ (पीसीबी)

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पिंपळे निलख येथे एका मतदान केंद्रावर तरुणाने मोबाईल फोन मतदान केंद्रामध्ये नेला. तिथे त्याने काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली.

मार्टिन जयराज स्वामी (वय 25, रा. विशाल नगर, पिंपळे निलख) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी निवडणूक विभागाचे अधिकारी नरेंद्र देशमुख यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख हे विशाल नगर पिंपळे निलख येथील विद्यानिक विनयनिकेतन शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 474 मधील मतदान बुधवर प्रीसायडिंग ऑफिसर म्हणून नेमणुकीस होते. आरोपी मार्टिन हा सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला. त्याने पोलिसांची नजर चुकवून मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन आणला. बॅलेट युनिट व व्हीव्ही पॅट यांचे फोटो काढले. बॅलेट युनिट वरील अनुक्रमांक एक वरील तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर बटन दाबून मत टाकल्याचा व तशी स्लीप व्हीव्हीपॅट मध्ये दिस्ल्याचा फोटो आणि व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ आणि फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले. यामध्ये त्याने मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग करत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.