वसई,दि. १९ (पीसीबी)
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा दावा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
विनोद तावडे हे आज मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. अजूनही बविआचे कार्यकर्ते हे हॉटेलबाहेरच ठाण मांडून बसले आहेत.
हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे हे अजूनही हॉटेलमध्येच असून दुसऱ्या मजल्यावर ते कोणत्या तरी रूममध्ये बसले आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशाराच दिला आहे. तसेच, यावेळी त्यांनी आपल्याकडे एक डायरी असून त्यात कुणाला पैसे वाटण्यात आले, त्याची माहिती आहे. वसई पश्चिम 5 अशा प्रकारे कोणत्या भागात किती पैसे पोहोचवायचे असं त्यात लिहिलं असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय.
हॉटेल विवांतबाहेर मोठा जमाव
इतकंच नाही तर, विनोंद तावडे यांना जेव्हा पैसे वाटताना पकडण्यात आले तेव्हा त्यांनी आपल्याला 25 फोन करत विनवणी देखील केली असल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. ‘मला माफ करा, मला जाऊ द्या’ अशी विनवणी विनोद तावडे यांनी केली असल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. हॉटेल विवांतबाहेर आता पोलीसही दाखल झाले आहेत.
हॉटेलबाहेर स्वतः हितेंद्र ठाकूर त्यांचे पुत्र आणि हजारो कार्यकर्ते हे ठाण मांडून बसले आहेत. तर, विनोद तावडे हे अजूनही हॉटेलच्या आतच असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता यावर पुढे काय होतं, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र,ऐन निवडणुकीत हा प्रकार घडल्याने याची राज्यभर चर्चा रंगली आहे.