आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या बापाला हरू द्यायचं नसतं – खासदार अमोल कोल्हे

0
4

पवारांचा विश्वास कलाटेंवर, कलाटेंना एक संधी देऊन पवार साहेबांना विजयी करा – खासदार कोल्हे

  • चिंचवडमध्ये रोड शो आणि सभांचा धडाका

राहुल कलाटेंवर पवारांचा विश्वास, कलाटेंना एक संधी द्या – खासदार कोल्हे

वाकड, दि. १८ (पीसीबी): पवार साहेबांचे पिंपरी चिंचवड शहरावर व शहराचं पवार साहेबांवर प्रेम आहे. पवार साहेबांनी कित्येक वर्षानंतर तब्बल साडेतीन तास रोड शो आणि सभेसाठी चिंचवड विधानसभेला वेळ दिली. चिंचवडमध्ये भाकरी फिरवायची आहे. शरद पवार यांना राहुल कलाटेंवर विश्वास आहे की हेच नेतृत्व उद्या पिंपरी-चिंचवड शहराला चांगली दिशा देऊन सर्वांगीण विकास करेल. त्यामुळे गेली १५ वर्षे फसलेले घराणेशाहीचे गणित सुधारून राहुल कलाटे यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा विचार विजयी करा. ८४ वर्षांच्या त्या बापाला आठवा, आयुष्याच्या संध्याकाळी त्याला हरु द्यायचं नसतं. अशी भावनिक साद अमोल कोल्हे यांनी चिंचवडकर मतदारांना घातली.

औद्योगीक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात नागरी समस्या, मूलभूत सोयी सुविधांची कमतरता जाणवत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे, आपल्या भाच्यांना कंत्राट देणाऱ्या, जमिनी हड्पणाऱ्यांना नाही तर तुमच्या उपयोगी येणाऱ्या राहुल दादांना एकदा संधी द्या. यंदा वारं फिरलंय, चिंचवडमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी काल अमोल कोल्हे यांनी रावेत – किवळे भागात रोड शो केला तसेच वाल्हेकरवाडी, काळेवाडी इथे सभे दरम्यान कोल्हे बोलत होते.
यावेळी संज्योग वाघेरे, मच्छिन्द्र तापकीर, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे, अनिता उर्फ माई तापकीर, मयुर कलाटे, इम्रान शेख, सागर तापकीर, अनिता तुतारे, सुजाता नखाते, सुशिला पवार, सायली नढे, उल्हास कोकणे, तौफिक तांबोळी, रवी नांगरे, सचिन कोंढरे, दिनेश नढे, पौलाद बारसे, कुंदन शिंगटे, प्रकाश मुरकुटे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, संजय मोरे उपस्थित होते.

बचेंगे तो और भी लढेंगे’ची परंपरा – डॉ कोल्हे

फुले, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात येऊन निम्मा उत्तर प्रदेश पोट भरतो आणि उत्तरप्रदेशचे योगी येऊन ‘बटेंगे तो कटेंगे’ची भाषा करताहेत तर त्यांना सांगायची वेळ आलीय हा महाराष्ट्र आहे. इथली परंपरा बचेंगे तो और भी लढेंगे वाली आहे. बचेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज त्यांच्या गंगा-यमुना काठच्या भुसभुषीत मातीत उगवत असेल. हा काळ्या कातळाचा सह्यादी आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या, बारा बलुतेदारांना आणि सोळा अलुतेदारांना घेऊन स्वराज्याच स्वप्न उभ केल होतं. त्या महाराष्ट्रात जातीय विष पसरत नाही.

कोट: चिंचवडमधील भ्रष्टाचार कमी करून सर्वांगिण विकास साधण्यासाठी मला एकदा संधी द्या. माझ्यावर विश्वास ठेवून कर्तृत्वशून्य घराणेशाहीला तुम्ही घरी बसवाल, यावर मला विश्वास आहे. आपला ईव्हीएमवरील अनुक्रमांक एक आहे. आपल्या सर्वांसाठी एक नंबरचेच दर्जेदार काम करण्याचं माझं वचन आहे. – राहुल कलाटे, उमेदवार, महाविकास आघाडी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

सभेतील इतर महत्वाचे मुद्दे:
लोकसभेला मतांची कडकी बसल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. महागाईचा कळस झालाय. पोरगं जन्माला येतं तेंव्हा त्याला वॅक्सिंन देण्यापासून माणूस गेल्यावर तिरडीवर अंथरायच्या कापडावर सुद्धा जीएसटी आहे. सगळं तुमच्या माझ्या खिशातून ओरबाडून घेतात आणि सांगतात आम्ही तुम्हाला देतोय अशा शब्दात सरकारवर परखड टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदूमिलच्या डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन खुद्द पंतप्रधान मोदींनी केलं. मात्र, या भाजप सरकारने त्यावर पुढे काहीच होऊ दिले नाही. आमच्या महापुरुषांचा अपमान केला; वारकरी समुदायावर लाठीचार्ज केला. भाजपला जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची अन महाराष्ट्राच्या धर्म राखण्याची ही निवडणूक आहे, असेही कोल्हे म्हणाले.

महाराष्ट्रासाठी, पिंपरी-चिंचवडसाठी, तरुणांच्या नोकऱ्यांसाठी, येथील आयटी पार्कसाठी, तुमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आयुष्यातली ५५-६० वर्षे देणाऱ्या पवार साहेबांच्या पक्षाचे चिन्ह, नेते आणि सगळं या भाजपावाल्यांनी पक्षाच्या नावासकट काढून घेतलं. पक्ष फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण केलं. अपरिमित भ्रष्टाचार केला. राज्यातील उद्योग परराज्यात पाठवून स्थानिक रोजगाराला तिलांजली दिली. महागाई कित्येक पटीत वाढली. पण ८४ वर्षांचा योद्धा झुकणार नाही म्हणत ‘लढणार आणि जिंकणार’ म्हणाला.