तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी…

0
4

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या चाराच्या तोफा आज थंडावणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रचार सभांमधून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. ठाकरे गटाकडून देखील राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. अलीकडेच विक्रोळीमध्ये झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेचं संजय राऊत यांनी निमंत्रण देण्यात आले होते. तसेच या सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक रिकामी खूर्ची देखील ठेवण्यात आली होती. आता यावर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

विक्रोळीमध्ये महाविकास आघाडीचे सुनील राऊत यांच्या प्रचार सभेत संजय राऊत म्हणाले की, एका सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली होती. मला याचे कारणच कळाले नाही. मी म्हटले, आपली सभा आहे आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण, 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट निष्ठावंत सैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. आम्ही आमचा इमान विकला नाही, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली, म्हणून आम्ही * सारखे वागलो नाही. तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून संपवून टाकू, असा इशारादेखील संजय राऊत यांनी दिला.

ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी हा महाराष्ट्र भिकारी केला, त्यांचे आपण पाय चाटता. ते ठाकरे आहेत आणि आम्ही राऊत आहोत, तेही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले राऊत आहोत. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका. महाराष्ट्राचे शत्रू फडणवीसांची पालखी वाहू नका. अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांना माझ्या नावाने झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे, असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांना मी आमंत्रण देतो अधूनमधून तुम्ही इथे येत राहा. इथे तुमच्या खाटा टाकायचे काम आमचे शिवसैनिक करतील. एकदिवस तुमची त्या खाटेवरून राजकीय अंत्ययात्रा काढू. तुम्हाला महाराष्ट्रातून संपवून टाकू. या महाराष्ट्रात तुम्ही राहणार नाही, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असेही त्यांनी म्हटले.