पिंपळे गुरव परिसरात सुदर्शन कॉलनी, वैदवस्ती परिसरातील प्रकार
चिंचवड : चिंचवड मतदारसंघातील पिंपळे गुरव परिसरात सुदर्शन कॉलनी, वैदवस्ती भागातील मतदारांना पैसे वाटप व इतर स्वरूपाचे आमिष दाखवण्यात येत असून मतदारांचे ओळखपत्र जमा केल्याची लेखी तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या प्रकरणात आदर्श आचारसंहितेचा भंग होत असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात यावी असे कलाटे यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पिंपळे गुरव, सांगावी भागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांचे मतदान कार्ड जमा करून घेतले जात आहे. तसेच निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना वेगवेगळे अमिश दाखवले जात आहे. नागरिकांनी हे आमच्या लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे याबद्दल तक्रार केली आहे. असे प्रकार लोकशाहीसाठी घातक आहेत. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करू नये यासाठी निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कलाटे यांनी केली आहे.
मतदान प्रक्रिया पारदर्शन असावी यासाठी अशाप्रकारे कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने मतदारांची मते मिळवण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला, तर नागरिकांनी सी-व्हीजिल ॲपद्वारे तक्रार करावी, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे.