पिंपरी, दि. १६ (पीसीबी)
प्राधिकरण निगडी भागात अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रचारफेरी दरम्यान दिली. लिफ्टच्या सुविधेसह दोन मजली विरंगुळा केंद्र ही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी निगडी प्राधिकरण परिसरात प्रचार फेरी काढली. काही ठिकाणी पायी चालत तर काही ठिकाणी रथातून ही प्रचार फेरी निघाली. यावेळी प्राधिकरण परिसरातील भाजपसह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
तत्पूर्वी मोहन नगर, काळभोर नगर परिसरात झालेल्या पदयात्रेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील आमदारांना बनसोडे ( Anna Bansode) यांना बहुमताने निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले. गवळी समाजाच्या वतीने उपस्थित महिलांनी अण्णा बनसोडे यांचा सत्कार करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहर महिला संघटिका सरिता साने, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर कांबळे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, राजू दुर्गे, शितल शिंदे, सतीश दरेकर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भाजप शहर उपाध्यक्ष गणेश लंगोटे, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, संजय अवसरमल आदी उपस्थित होते.
प्रचार फेरी टिळक चौक येथून सुरू झाली. पुढे निळकंठेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, काचघर चौक, सोमेश्वर मंदीर, भेळ चौक, सावरकर मंडळ, सोमेश्वर चौक, गणेश तलाव, संत तुकाराम गार्डन, स्वामी विवेकानंद मंडळ, जय हिंद मित्र मंडळ, आंबा चौक, साई बाबा मंदिर या मार्गावरून काढण्यात आली.
महायुतीने केलेल्या कामांबाबत सर्व नागरिक आनंदी आहेत. पुढील काळात महायुती अधिक चांगल्या पद्धतीने कामे करणार असल्याचा विश्वास प्राधिकरणातील नागरिकांनी व्यक्त केला. त्यामुळे आम्ही सर्वजण महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असे आश्वासन प्राधिकरणातील नागरिकांनी दिले. आमदार अण्णा बनसोडे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महिला भगिनींनी त्यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.