शरद पवार यांची भोसरीत गावजत्रा सभा, निर्णायकी असेल ?…

0
147

थर्ड आय – अविनाश चिलेकर

शरद पवार यांची उद्या सायंकाळी भोसरीच्या गावजत्रा मैदानावर प्रचारसभा होणार आहे. भोसरी मतदारसंघातून अजित गव्हाणे, पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंत आणि चिंचवडचे राहुल कलाटे या महाविकास आघाडी उमेदवारांसाठी ही एकमेव सभा आहे. २००९ पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहराचा समावेश होता त्यावेळी भोसरीतील पवार यांची सभा ठरलेली असे. राज्यातील सर्वात मोठ्या हवेली विधानसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहर होते, त्याहीवेळी शरद पवार यांची भोसरीची सभा काय चमत्कार करणार याकडे लक्ष लागलेले असायचे. प्रा. रामकृष्ण मोरे काँग्रेसचे उमेदवार होते आणि माजी आमदार ज्ञानेश्वर तथा माऊली लांडगेंनी बंडखोरी केली होती. शरद पवार आणि प्रा. रामकृष्ण मोरे यांचे राजकीय संबंध सर्वश्रृत होते. प्रा. मोरे यांच्या भोसरीतील प्रचार सभेत साहेबांना एकच गुगली टाकली. प्रचाराच्या समारोपाची सभा होती ती प्रा. मोरे सरांची मात्र, साहेब सहज नव्हे तर जाणीवपूर्वक बोलून गेले. ते म्हणाले, माऊली तसा चांगला कार्यकर्ता आहे. भोसरीकरांना काय जायचा तो संदेश गेला आणि प्रा. मोरे सरांचा टांगा निवडणुकित पलटी झाला. केवळ भोसरीच्या एका सभेने हा चमत्कार केला. बारामती लोकसभा निवडणुकित शरद पवार यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. प्रतिभा लोखंडे उमेदवार असताना खुद्द देशाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीसुध्दा मोठी प्रचारसभा गावजत्रा मैदानावरच झाली होती. इतिहास साक्ष देतो की, ज्या ज्या वेळी साहेबांची भोसरीत प्रचारसभा होते त्या त्या वेळी साहेबांच्याच पारड्यातच बहुःतांश मते पडली होती. साहेबांचा फोटो देवघरात ठेवणारे विलास लांडे एकदा महापौर, दोनदा आमदार झाले होते ते सुध्दा केवळ आणि केवळ शरद पवार यांच्या डावपेचांमुळे. आता याच पठडीत अजित गव्हाणे यांच्यासाठी खुद्द शरद पवार सभा घेत आहेत. चार वेळा नगरसेवक, एकदा स्थायी समिती अध्यक्ष असलेला एक अत्यंत सभ्य, सुसंस्कृत, मितभाषी, सिव्हील इंजिनिअर म्हणून लोक गव्हाणे यांची तुलना करू लागलेत. शरद पवार यांच्यासारख्या पारखी नेत्याला भोसरीच्या खाणीतून पैलू पाडलेला हिरा गवसला. अशक्य ते शक्य झाल्याचे चित्र आहे. काल परवा आमदार महेश लांडगे यांची सटकली आणि ते बोलून गेले की, राजकारण हा काही माझा पेशा नाही, तीन महिने मी खूप सहन केले आता पुन्हा मूळचा महेश लांडगे आणायला लावू नका. मुळात तिथेच लांडगे हे अलगद गव्हाणे यांच्या ट्रॅपमध्ये अडकले आणि त्यांची गाडी घसरली. आमदार लांडगे यांची ती व्हिडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आणि स्पर्धेत नसताना गव्हाणे हे आता स्पर्धेत आले. आता शेवटचा घाव शरद पवार यांचा असेल. म्हणूनच शरद पवार यांची सभा खूप महत्वाची असेल.
भ्रष्टाचार, संभाजी महाराज, स्मार्ट सिटी –
खरे तर, विधानसभा निवडणुकित जे मुद्दे प्रचारात जोमाने यायला पाहिजे ते तितक्या जोरकसपणे आले नाहीत. शहरात भाजप काळात झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा सर्वात कळीचा मुद्दा होता. स्मार्ट सिटीच्या पाच हजोर कोटींच्या विविध कामांत महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा वाटा होता. भाजपच्या नेत्यांनी या वाहत्या गंगेत अक्षरशः हात धुवून घेतला. मग ते २४ तास पाणी पुरवठा, पवना जलवाहिनी, भामा आसखेड, नदिवरचे मोठ मोठे पूल, उड्डाण पूल, सिमेंट रस्ते, झोपडपट्टी पुनर्वसन, सीसी कॅमेरे, ई-क्लास रूम, भूमीगत केबल, अर्बन फूटपाथ, स्वच्छता अशी शेकडो कामे आहेत. शहराची वाटणी करून वाटे घातले गेले. नेत्यांचेच मित्र, भाचे, पुतणे, काका, भाऊ, नाना यांच्या कंपन्यांनी अक्षरशः सगळीच कामे वाटून घेतली. तब्बल ५० ते ६० टक्के भ्रष्टाचार झाला. शिक्षक भरतीत ७० कोटी लूटले. भामा आसखेड मध्ये ३० कोटींची जादा दराची निविदा काढून लुटले. शितलबागचा पादचारी पूल ७० लाखांचा तब्बल सात कोटींना केला आणि चाटून पुसून खाल्ले. एकाचीही चौकशी नाही की कारवाई नाही. ज्यांनी बोंब मारली त्यांना वाटेकरी केले आणि आवाज बंद केला. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे प्रकरण. जागा बदलात १०-१५ कोटींची लूट केली आणि चक्क ४५ कोटी पर्यंत या स्मारकाचा खर्च गेला. दिघी रेडझोनचा परिसर म्हणजेच अत्यंत धोकादाक क्षेत्र असताना तिथे भूखंड पाडून जागा विकल्या आणि लोकांना फसवले.

संतपीठाच्या इमारतीत सीबीएसई स्कूल –
प्राधिकऱणाच्या मोकळ्या भूखंडांवर ताबे मारले आणि गोदामे बांधून भाड्याने दिली. महापालिकेच्या आरक्षणातील भूखंडांवर ताबे मारले आणि इमारती बांधल्या. चऱ्होली, मोशीच्या भूमिपुत्रांना चक्क सात बारा वाचवा, अशी घोषणा दिली आणि खळबळ उडाली. प्रकरण काय थराला गेले त्याचे हे जाज्वल उदाहऱण आहे. १० वर्षांत साचलेले सगळे बाहेर आले.
चिखली येथे दत्ता साने यांच्या संकल्पनेतून ४० कोटी खर्च करून संतपीठ उभे केले. आजच्या पिढीतून तिथे प्रवचनकार किर्तनकार घडतील आणि समाजप्रबोधन करतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात खासगी संस्थेमार्फत तिथे सीबीएसई शाळेचे दुकान सुरू झाले. मूळची संतपीठ संकल्पनाच धुळीस मिळाली. या सर्वाला जबाबदार कोण यावर शरद पवार काय भाष्य करतात त्याकडे लक्ष आहे.

अजितदादांची आळीमिळी गुपचिळी –

साहेबांना राज्यात नव्हे तर केंद्रात जायचे होते. १९९२ पासून शहराची सर्व सूत्र त्यांनी दादांच्या हातात सोपविली. पिंपरी चिंचवडची जहागिरीच साहेबांना लाडके पुतणे म्हणून अजितदादांकडे दिली. दादांनी सुध्दा पूर्ण लक्ष दिले आणि वीस वर्षांत या शहराचे कोटकल्याण केले. आता ईडी,सीबीआय कारवाईमुळे दादांची मजबुरी झाली आणि ते भाजपच्या पंखाखाली गेले. थोडक्यात भाजपचे मांडलिक झाले. शरद पवार यांना तेच नको असल्याने या काका पुतण्यांत संघर्षाची ठिणगी पडली. लोकसभेला बारामतीची लढाई साहेबांना हातोहात जिंकली आता विधानसभेला पुन्हा परिक्षा आहे. दादांची दुसरी जहागिरी असलेले शहर म्हणजे पिंपरी चिंचवड शहर. ८४ वर्षांचे आजोबा शरद पवार आता पुन्हा पिंपरी चिंचवड आपल्या ताब्यात घेणार का त्याचा निर्णय या विधानसभेला होणार आहे. शहरातील बहुसंख्य दादा समर्थकांनी साहेबांच्या कंपुत जाणे पसंत केले. शहरात शरद पवार यांचा चाहता वर्ग मोठा आहे. जुने जाणते सोडा नव्या पिढीलाही साहेबांचे मोठे आकर्षण आहे. शहरातील एचए कंपनी बंद पडणार होती ती कोणी वाचवली ते हजारो कामगार जाणतात. टाटा मोटर्स कंपनीला १८८ एकर जागा दिली आणि जमशेदपूरला जाणारा इंडिका प्रकल्प शहरात झाला, तो सुध्दा केवळ शरद पवार यांच्या सबंधामुळे. हिंजवडीच्या माळावर संत तुकाराम सहकारी साखर कारखाना होणार होता पण, भूमिपुजन सोहळ्यातच तिथे आयटी पार्क करणार असल्याचे सांगून पवार यांनी शहराला नवे जग दाखवले. हिंजवडी, तळवडे आयटी पार्क ही पवार यांचीच देणं. चाकण, तळेगाव, रांजणगाव एमआयडीसीची निर्मिती सुध्दा शरद पवार यांनी करविली. २५ वर्षांपूर्वीच्या शरद पवार यांच्या भाषणात या शहराची आर्थिक उलाढाल पाऊन लाख कोटींना वाढणार असल्याचे भाकित केल्याचे आजही आठवते. आज ते स्वप्न सत्त्यात उतरले कारण शरद पवार. इथे जमिनीला सोन्याचे दर आले आणि रिअल इस्टेट फॉर्मात आहे. केंद्र सरकारकडे जेएनएनयूआरएम आणि स्मार्ट सिटी मध्ये पिंपरी चिंचवड असावे यासाठी शरद पवार यांनी आग्रह धरला होता म्हणून काम झाले, असे खुद्द अजितदादाच सागंतात. अशा सर्व मुद्यांचा विचार केला तर शहराचे खरे पालक, मालक शरद पवारच ठरतात. आता हे मालक भाडेकरूंना बाहेर काढतात का ते पहायचे. म्हणूनच शरद पवार यांचे उद्याच्या सभेतील भाषण हे अनेक अर्थांनी खूप खूप महत्वाचे असणार आहे.