पिंपरी विधानसभेच्या उमदेवारांच्या खर्चाची पहिली तपासणी

0
79

निगडी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आज निगडी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ ’ क्षेत्रीय कार्यालय दुसरा मजला संत ज्ञानेश्वर चौक निगडी प्राधिकरण येथे पार पडली.
निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना (आय.आर.एस.), आणि जिल्हा निवडणूक खर्च समन्वयक अश्विनी मुसळे यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख माधुरी बांदल आणि सहाय्यक खर्च निरीक्षक वर्मा व शिल्पा मंकणी यांच्या अधिपत्याखाली उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी प्रक्रिया पार पडली. या वेळी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकापासून ते दि.०८/११/२०२४ अखेरचा खर्च तपासणीकरिता सदर केलेला होता.
भारत निवडणुक आयोग कार्यालयाकडील निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघ निवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला असून, याद्वारे उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी दि. १४ नोव्हेंबर रोजी आणि तिसरी तपासणी दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.
उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात आली असून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. पुढील दुस–या आणि तिसऱ्या तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी सर्व उमेदवारांना दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये इतकी आहे. २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा संघामध्ये एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते.