दापोडी,दि. ०८ (पीसीबी)– तुमचे कुरिअर आले असून त्यासाठी दहा रुपये ‘गुगल पे’वर पाठवा, असे सांगत एक नागरिकाची एक लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना दापोडी येथे घडली.
जयंत हरीभाऊ सावरकर (वय ५८, रा. सीएमई, दापोडी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. ७) दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजमल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी फिर्यादी सावरकर यांना एका व्यक्तीने फोन केला. तुम्हाला तुमचे कुरिवर हवे असेल तर श्री. ट्रैक कोन कुरीयर प्रा.लि. दिल्ली या कंपनीला ‘गुगल पे’ वरुन १० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी म्हणाला की, ‘गुगल पे’ ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाइलचे सुरुवातीचे ५ अंक टाईप करा” त्यावर फिर्यादीने त्यांचे मोबाईलचे सुरुवातीचे ५ अंक टाईप केले. त्यानंतर आरोपी म्हणाला की, मी आता माझ्या कुरियर वाल्यांना सांगतो की, तुमचे कुरियर पाठविण्याची प्रोसेस करा.
त्यानंतर फिर्यादी यांना फोन आला की तुमच्या सोबत काहीतरी फसवणुक होत आहे. त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या सीएमई दापोडी येथील भारतीय स्टेट बैंक ऑफ इंडीयाचे शाखेत गेले. त्यांनी विचारपूस केली असता त्यांच्या खात्यातून हतीनापुर बारपेटा (आसाम) येथील कॅनरा बँकमध्ये अजमल खान नावाचा व्यक्तीच्या खात्यावर ९१ हजार ४६९ तसेच धामारायका राय (तमिळनाडू) येथील कॅनरा बँकेमध्ये अजमल खान नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ८ हजार ४९९.७९ रुपये असे एकूण ९९ हजार ९६८.७९ ट्रान्सफर करून सावरकर यांची फसवणूक केली आहे.