२३ नोव्हेंबर नंतर महेश लांडगे आमदार म्हणून राहणार नाहीत – रोहित पवार

0
61

पिंपरी दि. ०८ (पीसीबी) : आघाडीच्या (राष्ट्रवादी) पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार हे आज शहरात आले होते.यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर लादलेली गुजरातशाही स्वाभिमानी मतदार धुडकावून लावणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रथमच ते अत्यंत आक्रमक दिसले. त्यांनी भोसरीचे आमदार आणि युतीचे (भाजप) उमेदवार महेश लांडगे यांचे नाव घेत त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. लांडगे २३ तारखेला आमदार राहणार नसल्याचा मोठा दावाही त्यांनी केला.

माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला,तर मी धारकरी आहे,असा इशारा आ. लांडगेंनी काल दिघीतील जाहीर सभेत विरोधकांना दिला होता.त्याचा तसाच समाचार रोहित पवार यांनी आज घेतला. लांडगे असे म्हणत असतील,तर आम्ही काय गोट्या खेळायला इथे आलो आहोत का, असे सणसणीत प्रत्युत्तर त्यांनी दिले.लांडगे हे फडणवीसांसारखे व्देष,दबावतंत्र आणि गुंडशाहीचे राजकारण करायला लागले आहेत.पण,ते आणि गुजरातशाही यावेळी महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हाकलून काढणार आहे,असे ते म्हणाले.टक्केवारी,दलालीवाले यावेळी घरी बसतील, २३ तारखेला महेश लांडगे हे आमदार नसतील, कारण भोसरीच नाही,तर पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही ठिकाणी यावेळी परिवर्तन घडणार असून नंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही ते होणार आहे,असा दावा त्यांनी केला.त्यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,असे मधाचे बोट त्यांनी आताच आपल्या पदाधिकाऱ्यांना लावून ठेवले.

दी इलेक्शन दॅट सरप्राईड इंडिया या ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात भाजपने ई़डीची भीती दाखवल्याने विरोधी बाकावरील अनेक नेते त्यातही राष्ट्रवादीचे हे भाजपला जाऊन मिळाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्याविषयी विचारले असता ते शंभर टक्के खरे असून त्याविषयी आम्ही अगोदरपासून तेच सांगत होतो,असे रोहित पवार म्हणाले.ज्यांना पळून जायचे होते, ते गेले.आम्ही,मात्र लढत आहोत,या त्यांच्या पुढील वाक्याचा रोख हा अजित पवारांकडे होता.ओबीसी असल्याने आपल्यावर ईडीची कारवाई झाली,या भुजबळांच्या त्या पुस्तकातील कथित दाव्यावर ओबीसीच नाही,तर मराठा,अल्पसंख्याक अशा सर्वांच्या तोडफोडीचे गलिच्छ राजकारण भाजप २०१४ पासून करीत आहे,असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला.यावेळी त्यांच्यासोबत भोसरीचे त्यांचे उमेदवार अजित गव्हाणे, शिवसेनेचे रवी लांडगे आदी उपस्थित होते.