पिंपरी विधानसभांतर्गत मेट्रोमध्ये मतदान जनजागृती…

0
3

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : मेट्रोमध्ये रोज लाखोंच्या संख्येने प्रवास करणा-या प्रवाशांनी २० नोव्हेंबर रोजी येणा-या विधानसभा निवडणूकीत सहभागी होऊन मतदान करावे असे आवाहन पिंपरी विधानसभा कार्यालयाचे स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार २०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार आज पिंपरी ते दापोडी दरम्यान धावत्या मेट्रोमध्ये मेट्रो प्रशासनाच्या सहकार्याने मतदान जनजागृती करण्यात आली, त्यादरम्यान निवडणूक विभागाच्या वतीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, २०६ , पिंपरी (अ.जा.) विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे, महा व्यवस्थापक कॅप्टन सणेर पाटील, मनोजकुमार डॅनियल,वाणिज्य सल्लागार दत्ता माने यांच्या सहकार्यातून मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मेट्रो प्रवाशांनी “ आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या मतदान जनजागृती स्वीप विभागाचे संदीप सोनवणे, महालिंग मुळे, दिनेश जगताप तसेच मेट्रोचे शुभम दळवी, विनोद सोळकंठी, अभिषेक शहादाणी आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमांत मतदान करण्यासाठी उपयुक्त अशा शासकीय मार्गदर्शनपर मतदान माहिती पत्रकांचे सर्वांना वाटप करण्यात आले असून या पत्रकात मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर व सचित्र माहितीचा समावेश आहे.

पुणे -पिंपरी परिसरात मेट्रोची एकूण ३० स्टेशन्स आहेत. त्यापैकी ५ भुयारी स्टेशन्स असून रोजच्या प्रवाशांची संख्या १लाख ८० हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली. स्टेशनवर मतदान जनजागृतीपर फलक देखील लावण्यात आलेले आहेत.

मेट्रो प्रवासादरम्यान अनेक मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

दिनेश यादव – मी टाटा मोटर्सचा कामगार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान दिवसानिमित्त इंडस्ट्रियल झोनमध्ये सर्व कामगारांना मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात आलेली आहे. सुट्टीचा वापर सर्वांनी सर्वप्रथम मतदान करुन करावा.

अँड. अनुजा लोखंडे- मी स्वत: वकील असून आम्ही सर्व वकील प्रत्येक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावत असतो, तसा हक्क तुम्हीही सर्वांनी बजवावा .

प्रतिभा इंगळे- मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका या पदावर काम करीत असून सर्वांना मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करते.

अँड. तेजस्व‍िनी शिंदे- प्रत्येक भारतीयाला मिळालेत महत्त्वपूर्ण हक्क म्हणजे मतदानाचा हक्क. तो सर्वांनी बजावून राष्ट्र तसेच देश सक्षम करण्यासाठी मतदान करण्याचा निश्चय करुया.

शिवानी कुदळे- सर्वांनी मतदान करणे गरजेचे असून मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क सर्वांनी बजवावा.

महिला जेष्ठ नागरीक – आम्ही आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणूकीत मतदान करीत आलो आहोत. तशी परंपरा भावी पिढीने चालू ठेवली पाहिजे व मतदानाचा हक्क बजावला पाहिजे