अखेर त्‍या डाॅक्‍टर, परिचारिकांवर गुन्‍हा दाखल

0
3

एक वर्षापूर्वी हलगर्जीपणामुळे झाला होता दोन वर्षांच्‍या चिमुकल्‍याचा मृत्यू

चिखली, दि. 06 (पीसीबी) : पायाजवळ वॉर्मर मशीन ठेवल्‍याने गुडघ्‍याखालील पाय जळल्‍याने दोन वर्षाच्‍या बाळाचा मृत्‍यू झाला. ही घटना चिखलीतील इम्‍पिरीअल रुग्‍णालयात १८ नोव्‍हेंबर २०२३ रोजी घडली. ससून रुग्‍णालयातील समितीच्‍या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍याने तीन डॉक्‍टरांसह दोन परिचारिकांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

दिरांश रमाकांत गादेवार (वय २) असे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या मुलाचे नाव आहे. याबाबत त्‍याची आई दीपाली गादेवार (वय ३६, रा. नेवाळेवस्‍ती, चिखली) यांनी मंगळवारी (दि. ५) चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डॉ. जितेश मदनसिं दाभोळ, डॉ. रजनिश जगदंबाप्रसाद मिश्रा, डॉ. रोहन प्राणहंस माळी, परिचारिका रेचल अनिल दिवे, सविता नंदकिशोर वरवटे यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

वॉर्मरमुळे पाय जळाला

फिर्यादी दीपाली यांच्‍या मुलाला सर्दी झाल्‍याने त्‍यास डॉ. दाभोळ यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार नेवाळेवस्‍ती, चिखली येथील इम्‍पिरीअल रुग्‍णालयात दाखल केले. त्‍यांच्‍यावर उपचार सुरू असताना १८ नोव्‍हेंबर रोजी सकाळी सात वाजताच्‍या सुमारास डॉ. मिश्रा, डॉ. रोहन हे बाळाचे सॅम्‍पल घेण्‍यासाठी आले. त्‍यांनी दिरांश याच्‍या आईला बाहेर थांबण्‍यास सांगितले. त्‍यानंतर सकाळी आठ वाजताच्‍या सुमारास दीपाली या पुन्‍हा मुलाजवळ आल्‍यानंतर त्‍यांना धक्‍काच बसला. बाळाच्‍या पायाजवळ ठेवलेल्‍या वार्मर मशीनमुळे बाळाचा गुडघ्‍याखाली पाय पूर्णपणे जळाला. या घटनेत दिरांश याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

वर्षभरानंतर समितीचा अहवाल प्राप्‍त

याबाबत दीपाली यांनी रितसर तक्रार दिली. यामुळे बाळाच्‍या उपचाराची कागदपत्र ससून येथील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या समितीकडे पाठविली. नुकताच या समितीचा अहवाल प्राप्‍त झाला. या अहवालात तीन डॉक्‍टर व दोन परिचारिका यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यानुसार चिखली पोलीस ठाण्‍यात तीन डॉक्‍टरांसह पाच जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.