मुंबई, दि. 06 (पीसीबी) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकासाआघाडी जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना या मुलाखतीत नागपूरमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना बंदी घालण्यात आली होती, यावरुन प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, “राहुल गांधी हे आता काँग्रेस राहिले नाहीत. त्यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली आहे. ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. ते आता कट्टरपंथी विचारधारेकडे वळले आहेत. त्यामुळेच ते ओरिजनल निळ्या रंगाऐवजी ते लाल रंगाचं कव्हर असलेली संविधानाची प्रत दाखवत असतात”, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.
“राहुल गांधी यांनी भारत जोडो सुरू केलं होतं तेव्हा चांगली योजना आहे वाटलं होतं. किमान भारत त्यांच्या अजेंड्यावर आहे. पण त्यात १८० अशा संघटनांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये अराजकता पसरवणारे होते. हे रेकॉर्डवर आहे. राहुल गांधींनी एका हातात संविधान धरलंय पण त्यांचं काम मात्र अराजकता पसरवणारं आहे. भारत जोडो समूहामध्ये सहभागी झालेल्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय एक्सट्रीम डाव्या विचारायचे आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत बघितली तर ती अराजकता पसरवण्याची आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“एन आर के सिस्टीम असं आपण त्याला म्हणूया. राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे पण मग लाल संविधान का? लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असो ऑर्डर आणि एन आर के चा अर्थ असतो डिसऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात. त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम याठिकाणी होत आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.
अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही. अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेच रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हेच काम अराजकतेला पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला.