मुंबई, दि. 06 (पीसीबी) : राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल सुरु केलाय. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं, ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आणि ना एकनाथ शिंदेंची. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी असल्याचं सांगत राज ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला. तर ज्यांनी धनुष्यबाण गहाण ठेवला, तो धनुष्यबाण आम्ही सोडवला असं प्रत्युत्तर शिंदेंनी राज ठाकरेंना दिलं आहे. आता अचानक राज ठाकरेंचा ट्रॅक का बदलला. गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे आणि शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर अनेकदा भेटीगाठीही झाल्या. पण आताच निवडणुकीत राज ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे येण्याचं कारण म्हणजे, माहिमची जागा.
माहिममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उभे आहेत. त्यामुळं माहिममधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांनी माघार घेण्याची भूमिका भाजपनं घेतली. पण शिंदेंच्या शिवसेनेनं माहिममधून माघार घेतली नाही उलट राज ठाकरेंनी चर्चा न करताच उमेदवार दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तरीही शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकरांच्या माघारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करुन मनसेसाठी एक प्रस्तावही तयार करण्यात आला, अशी माहिती आहे.
माहिमच्या बदल्यात मनसेनं मुंबई आणि ठाणे अशा 6-7 ठिकाणी माघार घ्यावी असा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेनं दिला होता अशी माहिती सूत्रांची आहे, राज ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव मान्यही होता. मात्र शेवटच्या क्षणी स्वत: सदा सरवणकरांनी मुलाला राज ठाकरेंकडे पाठवलं आणि राज ठाकरेंनी मुलाद्वारे पाठवलेल्या मेसेजनंतर मला भेट नाकारल्याचा आरोप सदा सरवणकरांनी केला. इथूनच माघार घेण्याचं फिस्कटलं. त्यातूनच शिंदे आणि राज ठाकरेंमधला संबंधही ताणले गेल्याचं दिसतंय. आता मनसेकडून सरवणकरांवरही उघडपणे टीका सुरु झाली आहे. माहिममध्ये आता सदा सरवणकर, मनसेचे अमित ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत अशी तिहेरी लढत आहे. पण महायुतीचे उमेदवार सरवणकर असतानाही भाजप अजूनही अमित ठाकरेंच्या बाजूनं असल्याचं शेलारांच्या बोलण्यातून दिसतंय. अमित ठाकरेंनाच समर्थन करावं अशी महायुतीत चर्चा असल्याचं शेलार म्हणालेत.
म्हणजे महायुतीत मनसे नसली तरी भाजप माहिममध्ये अमित ठाकरेंचं काम करु शकते, असे संकेत शेलारांनी दिलेत. माहिममचाच इम्पॅक्ट म्हणून की काय राज ठाकरे शिंदेंवर पक्ष आणि चिन्हावरुन निशाणा साधतायत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरुनच नाही तर, आता अजित पवार कसे चालतात म्हणत शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. राज ठाकरेंच्या कल्याण आणि ठाणे. या दोन्ही सभेत अधिक वेळ निशाण्यावर उद्धव ठाकरें, शरद पवारांसह शिंदेच होते. माहिममध्ये पडलेल्या ठिणगीचाच हा परिणाम असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.