आदर्श आचारसंहितेचे पालन करा

0
50

थेरगाव, दि. 06 (पीसीबी) : विधानसभा निवडणूक निर्भयपणे व शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तसेच उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी उमेदवारांनी प्रचार करताना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक गोष्टीची रिसतर परवानगी घेणे गरजेचे असून काही तक्रारी असल्यास C-VIGIL या ऍपवर नोंदवाव्यात, असे निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव येथील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील बापूजी बुवा सभागृहामध्ये निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू आणि निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू म्हणाले, उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅली, रोड-शो, प्रचार सभा इत्यादी बाबत एक खिडक कक्ष योजनेअंतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ४८ तास अगोदर परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी २४ तासांच्या आत देण्यात येईल. तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी वापरण्यात येणारी स्पिकर आणि वाहने याबाबतही परवानगी घेणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त प्रचार प्रसारासाठी जे पोस्टर्स छपाई करून घेतले जातात त्यावर संबंधित मुद्रणालयाचे नाव, संपर्क क्रमांक छापणे, एकूण छपाई केलेल्या पोस्टर्सचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.

सोशल मिडीयाचा वापर प्रसिद्धीसाठी करताना प्रसिद्धीस दिलेला मजकुर प्रक्षोभक आढळल्यास उमेदवाराविरोधात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल. याव्यतिरिक्त वर्तमानपत्र व टीव्ही चॅनल्सवर दिलेल्या जाहिरातीबाबतचा तपशील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे, असेही मनवेश सिंग सिद्धू यावेळी म्हणाले.