मी व्यापारी, व्यावसायिकांच्या पाठीशी; कोणावर अन्याय होऊ देणार नाही

0
44

सिरवी क्षत्रिय समाज आई माताजी ट्रस्टच्या बैठकीत शंकर जगताप यांनी दिला विश्वास

चिंचवड, दि. 05 (पीसीबी) : कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, कोणाला ही घाबरु नका. पिंपरी चिंचवड शहरात कोणावरही अन्याय होत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे. शहरात गुंडाराज चालणार नाही, व्यापाऱ्यांना कोणी त्रास देणार नाही. आपण सर्वजण कष्टाने आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे काम नाही, हा शंकर जगताप आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे असे आश्वासन, चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी केले.

भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज थेरगाव येथील सिरवी क्षत्रिय समाज आई माताजी ट्रस्टच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत व्यापाऱ्यांना आवाहन करताना जगताप बोलत होते.

यावेळी उपस्थित ट्रस्टच्या पदाधिकारी व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे “शंकर जगताप आगे बढो, हम तुमारे साथ है”, “एकच ध्यास, “चिंचवड विधानसभेचा विकास”, अशा घोषणा देत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन समाज बांधवांना केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक अभिषेक बारणे, काळुराम बारणे, तानाजी बारणे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, ऍड. राजेश राजपुरोहित, सागर बारणे, प्रमोद पवार, हेमंत भाटी यांच्यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते व सिरवी क्षत्रिय समाज आई माताजी ट्रस्टचे पदाधिकारी व व्यापारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यापारी वर्गासोबत संवाद साधताना शंकर जगताप म्हणाले की, चिंचवडसह अनेक ठिकाणी लहान-मोठ्या बाजारपेठा आहेत. व्यापारी वर्गाला उद्भभणा-या अडीअडचणी आणि त्यांचे प्रश्न सोडविणार असून व्यापारी वर्गाचे प्रश्न मांडून त्याला वाचा फोडण्याचे काम करू, असे आश्वासन या निमित्ताने जगताप यांनी व्यापारी वर्गाला दिले. तसेच, येत्या 20 तारखेला कमळ चिन्ह लक्षात ठेवून महायुतीला विजयी करा, अशी साद जगताप यांनी यावेळी घातली.