“कविता बंधमुक्त असावी!” – प्रवचनकार उत्तम दंडिमे

0
65

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) : “कविता बंधमुक्त असावी!” असे प्रतिपादन हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव आणि ज्येष्ठ प्रवचनकार उत्तम दंडिमे यांनी आर्य समाज ग्रंथालय, पिंपरी कॅम्प येथे मंगळवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी केले. शब्दधन काव्यमंचच्या माध्यमातून पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज ग्रंथालय व मोफत वाचनालयात आयोजित केलेल्या दिवाळी माध्यान्ह या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उत्तम दंडिमे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, शब्दधनचे सचिव ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे, कवयित्री फुलवती जगताप, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, लेखक नारायण कुंभार, सत्संग परिवारातील रमेश पाटील, विधिज्ञ अंतरा देशपांडे, ज्येष्ठ कवी कैलास भैरट यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे तीस कवींनी कविसंमेलनात कवितांचे सादरीकरण केले.

उत्तम दंडिमे पुढे म्हणाले की, “समाजात जाती – धर्माच्या नावावर सतत संघर्ष होत असतो, बदल होत असतो. त्यामुळे समाजमनाची घालमेल होते, लोकांच्या मनात द्वंद्व निर्माण होते. तेव्हा कवीने अशा घटनेकडे शुद्ध अंत:करणातून तथा ज्याला आपण ‘थर्ड आय’ म्हणतो, अशा दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली साहित्यसंपदा लोकप्रिय आणि लोकाभिमुख होते. देशात महिलावरील अत्याचार, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, भ्रष्टाचार, रोजगार अशा अनेक ज्वलंत समस्या आहेत. साहित्यिकांनी याचा अभ्यास करणे व सत्य परिस्थिती समाजासमोर मांडणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली कविता बंधमुक्त असावी!” त्यांनी “कविता राग है, अनुराग है, दहकती आग हैl कविता भावप्रबोधन है, जीवन शोधन है आत्मानुशासन है ll” ही हिंदी कविता सादर केली. शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. गायिका कांताताई पाटील यांनी, “आज सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु ll हरी पाहिला रे, हरी पाहिला रे ll” हे भावगीत सादर केले. त्यामुळे संमेलनात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
“सणामध्ये सण हा दिवाळीचा सण, कसा करू साजरा दिवाळीचा सण?” सूर्यकांत भोसले यांनी सादर केलेली ही कविता आणि “खचू नको थांबू गड्या, पुढे पुढे चाल” या कवितेतून डॉ. प्रशांत पाटोळे यांनी महागाईवर भाष्य केले. तर “किती सांगू मी सांगू कुणाला, दिवाळीचा हा उत्सव आला…” या जयश्री गुमास्ते यांच्या कवितेतून दिवाळीचा आनंद व्यक्त करण्यात आला. आनंदराव मुळूक यांच्या मोबाईल विषयावरील विडंबनगीताने सभागृहात हास्यकल्लोळ माजला; तसेच बालकवयित्री श्रावणी अडागळे हिच्या “सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं, हिरव्या साडीला पिवळी किनार गं” या गीताला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. गजानन उफाडे, नारायण कुंभार, सुहास सतर्के, शामराव सरकाळे, विलास कुंभार, शोभा जोशी, अरुण कांबळे यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. शिवाजी शिर्के, राजू जाधव, आय.के.शेख, कांचन नेवे, आत्माराम हारे, हेमंत जोशी, सुभाष वाघमारे, संजना मगर, अशोक सोनवणे, फुलवती जगताप, सुभाष चव्हाण, रेवती साळुंखे, बाळकृष्ण अमृतकर, सुभाष चटणे, रफिक अत्तार, तानाजी एकोंडे यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण कवितांमुळे दिवाळी माध्यान्ह कविसंमेलन रंगतदार झाले.

प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे म्हणाले, “कविता सहज सुचत नसते, त्यासाठी साहित्यिकांनी आपला व्यासंग समृद्ध करायला हवा. आपल्या कवितेतून कवी चंद्र आणि सूर्यालाही प्रकाशमान करत असतो. त्यासाठी कवीने सकारात्मक राहून चिंतन करायला हवे.” शेवटी त्यांनी ‘मी कवी मस्त आहे’ , ही कविताही सादर केली.

शब्दधन काव्यमंचचे सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे आपल्या मनोगतातून म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत साजरे होत असलेले सणोत्सव आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत, ते दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. मानवी जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण आपल्या संस्कृतीत दडलेले आहे; परंतु आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही. त्यासाठी आपण बाह्य जगाकडे आशादायक नजरेने पाहत असतो, याची खंत वाटते.” ते पुढे म्हणाले की, “दिवाळी सांज तथा दिवाळी पहाट सर्वत्र होत असते; परंतु रसिकांच्या आणि साहित्यिकांच्या सोयीसाठी शब्दधन काव्यमंच दुपारच्या सुमारास ‘दिवाळी माध्यान्ह’ कविसंमेलन घेत असते. हे या संमेलनाचे खास वैशिष्ट्य आहे.”

शामराव सरकाळे, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, राजू जाधव, विधिज्ञ अंतरा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. निवेदिका सीमा गांधी यांनी आपल्या खुसखुशीत आणि बहारदार सूत्रसंचालनातून संमेलनाची उंची वाढवली. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले