मुंगी साखर खाते, तसं मनसेच मुख्य अन्न सुपारी; संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

0
4

मुंबई, दि. 30 (पीसीबी) : “शेकाप मविआमध्ये आहे. शेकापला ज्या जागा हव्या, त्या शिवसेनेकडे आहेत. शेकापची ताकद कोकणात विशेषकरुन रायगडमध्ये आहे. त्या जागा आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. अलिबाग, सांगोला या शिवसेनेच्या जिंकलेल्या जागा आहेत” असं खासदार संजय राऊत म्हणाले. लोकसभेला ठाणे, कल्याणमधील पराभवावर संजय राऊत म्हणाले की, “पराभव लादला गेला. यंत्रणांचा वापर करुन दुबार मतदान अशा अनेक गोष्टींचा वापर करुन ठाण्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी अधिक जागरुक आहोत”

टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला नेला, त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “हा प्रकल्प विदर्भात नागपूरला होणार होता. त्यासाठी जमीन निश्चित झाली होती. स्पेनच्या सहकार्याने हा टाटा एअरबसचा प्रकल्प होणार होता” “सुरुवातीला 40 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राला मिळणार होती, त्यातून 10 हजार लोकांना रोजगार मिळणार होता. पण नरेद्र मोदींनी हा प्रकल्प गुजरातला पळवून नेला. हा महाराष्ट्रावरचा अन्याय आहे, असं आमच्या राज्यकर्त्यांना वाटत नसेल तर त्यांनी गुजरातला निघून जावं” असं संजय राऊत म्हणाले.

“शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाच हेडक्वार्टर गुजरातला आहे. त्यांनी तिथे जाऊन राजकारण करावं. महाराष्ट्रात मराठी माणसाच राजकारण करु नये” असं संजय राऊत म्हणाले. वांद्रे पूर्वमधून मनसेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे, त्यावर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलं. “महाराष्ट्रात काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य खाद्य सुपारी आहे. ते सुपारीवर जगणारे पक्ष आहेत. मुंगी साखर खाते, झुरळ वेगळं काहीतरी खातं, वाघ अजून कायतरी खातो. राजकारणात असे काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य अन्न सुपारी आहे. आता सुपारीवर जगणाऱ्या लोकांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्राच्या शत्रुंशी हातमिळवणी केली असेल, तर ते या राज्याच दुर्देव आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.