उद्योगनगरीत ठाकरेंची शिवसेना झिरो : थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
5

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) : खासदार, आमदारकीत स्वतःचा ठसा उमेदवलेली बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पिंपरी चिंचवड शहरातून हद्दपार झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अजित पवार यांनी नाही तर, खुद्द शरद पवार यांनीच ती खेळी केली. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा एकाही विधानसभेच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारी मिळालेली नाही. आजही १६ लाख मतदारांत शिवसेनेची किमान दीड-दोन लाख गठ्ठा मते आहेत. शहराच्या राजकारणात ४० वर्षांपासून दबदबा असलेली शिवसेना आता विधानसभेच्या निमित्ताने शुन्यावर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकिला ती पूर्णतः नेस्तनाबूत झाली तर वाईट वाटायला नको. ताकद आणि सक्षम उमेदवार असूनही एकसुध्दा जागा वाट्याला आली नाही. लढणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांवर आता रडायची वेळ आली आहे.

खरे तर, खुद्द बाळासाहेबांच्या हस्ते काळभोरनगर, फुगेवाडी, भोसरी अशा शाखा सुरू झालेली शिवसेना आज मरनासन्न अवस्थेत आली. घरमालक आणि भाडेकरूंचा संघर्ष झाला होता. काळभोरनगरच्या त्या घटनेतूनच इथे ठिणगी पडली. गजानन बाबर, मनोहर भिसे यांनी शिवसेनेचे रोपटे लावले आणि तेच पुढे फोफावले. पुढे त्याच ताकदिवर १९७८ च्या पहिल्याच नगरपालिका निवडणुकित गजानन बाबर नगरसेवक झाले. संघटन वाढत गेले आणि बाबर हे महापालिकेत सलग तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि मावळ लोकसभेचे पहिले खासदार झाले. जुन्या खेड लोकसभा मतदारसंघातून एकदा आणि नंतर नवीन शिरूर लोकसभेतून दोनदा शिवाजीराव आढळराव पाटील याच शहराचे खासदार होते. हवेली विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गजानन बाबर यांनी स्वबळावर तोसुध्दा जिंकला होता.

विधानसभानिहाय इतिहास पाहिला तर इथे शिवसेनेचे किती प्राबल्य होते ते समजेल. भोसरी परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. बाजीराव लांडे, आप्पा शेलार, सारंग कामतेकर, अशोक वाळके, सतिश फुगे, विजय फुगे, दत्ता गायकवाड, कैलास नेवासकर अशी हाडाच्या शिवसैनिकांची मोठी फौज इथे होती. त्या संघर्षाच्या काळात भाजपचे कसेबसे चार-दोन कार्यकर्ते होते. याच भोसरी मतदारसंघातून शिवसेनेची रणरागिनी अशी ओळख असलेल्या सुलभा उबाळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांच्याशी कडवी झुंज दिल्याचा इतिहास विसरता येत नाही. अवघ्या १२०० मतांनी लांडे पाटील जिंकले होते. २०१४ मध्ये पुन्हा सौ. उबाळे रिंगणात होत्या पण, मतविभागणीचा फायदा घेऊन महेश लांडगे जिंकले. खरे तर, याच महेश लांडगेंनी त्यावेळी मातोश्री वर तीनवेळा उमेदवारीसाठी येरझाऱ्या घातल्या होत्या. केवळ निष्ठावंत म्हणून सौ. उबाळे यांना संधी देण्यात आली होती. शिवसेनेच्या सरदार मंडळींचे दुर्लक्ष झाले आणि महेश लांडगे यांच्या मागे सगळी फौज गेली. आता इथे शिवसेनेचे नामोनिशान शिल्लक नाही. यावेळी महाआघाडीत असल्याने शिवसेनेतून भोसरीची उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे रवी लांडगे यांनी वाजतगाजत संघटनेत प्रवेश केला होता. महेश लांडगे यांच्या मॅन, मनी, मसल पॉवरला तोडिस तोड म्हणून रवी लांडगे यांच्याकडे पाहिले जात होते. शेवटपर्यंत त्यांना झुलवत ठेवले. अगदी अखेरच्या क्षणी उमेदवारीची माळ शरद पवार यांच्या राष्ट्रवाचे अजित गव्हाणे यांच्या गळ्यात पडली. रवी लांडगे यांनी बंडखोरी केली आणि अर्ज भरलाय पण, त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. म्हणजे आता भोसरीतून शिवसेना कायमची हद्दपार झाली.

चिंचवड विधानसभेतही झाली माती –
चिंचवड विधानसभेतही ठाकरेंच्या शिवसेनेचे मातेरे झाले. सलग तीन वेळा शिवसेनेतून खासदार झालेले श्रीरंग बारणे २००९ मध्ये शिवसेनेकडून विधानसभा लढले होते. तिथे ते हारले मात्र, नंतर मावळचे खासदार झाले. २०१४ मध्ये केवळ विधानसभा उमेदवारीसाठी राहुल कलाटे शिवसेनेत आले आणि भाजपचे बलाढ्य उमेदावर लक्ष्मण जगताप यांच्याशी कडवी झुंज दिली. २०१९ मध्ये कलाटे यांनी १ लाख १२ हजार मते घेतली होती. पुढे २०२२ ला पोटनिवडणुकित पुन्हा अपक्ष लढले आणि ४५ हजार मते मिळविली. लोकसभा आणि विधानसभांची गोळाबेरीज पाहिली तर शिवसेनेची इथे ५० हजार फिक्स मते कायम होती. महापालिकेत कलाटे यांनी शिवसेनेचे गटनेते म्हणूनही काम पाहिले. आता पुन्हा ते उमेदवार आहेत पण, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे. ठाकरेंच्या शिवसेनेची चलती होती म्हणून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, चंद्रकांत नखाते, मयूर कलाटे हेसुध्दा उमेदवारीसाठी मातोश्रीला धडकून आल्याचे सर्वश्रुत आहे. रावेतचे सरदार अशी ओळख असलेल्या मोरेश्वर भोंडवे यांनी ढोल वाजवत उमेदवारीसाठी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. वाटाघाटीत हा मतदारसंघसुध्दा शरद पवार यांनी घेतला आणि शिवसेनेच्या हातात भोपळा दिला. भोंडवे यांचा मोठा भ्रमनिरास झाला.

पिंपरीतही पोरखेळ रंगला आणि…
पिंपरी हा राखीव मतदारसंघ. कायम राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. २००९ आणि २०१९ ला राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे जिंकले. दोन्ही निवडणुकांत शिवसेना लढली होती. अनुभवसंपन्न, अभ्यासू, मितभाषी अशी ख्याती असलेले गौतम चाबुकस्वार एकदा जिंकले आणि नंतर हारले. या मतदारसंघातही शिवसेनेची किमान ४५ हजारावर मते आहेत. महाआघाडीकडून यावेळी पुन्हा चाबुकस्वार प्रबळ दावेदार होते. शहर प्रमुख सचिन भोसले यांनीही उमेदवारी मागितली होती. मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलाच नाही आणि गाड चिखलात फसलं. मूळच्या शिवसेनेच्या रणरागिनी, अभ्यासू, आक्रमक अशी ज्यांची प्रतिमा आहे त्या दोन टर्म शिवसेना आणि नंतर भाजप सत्ताकाळात तिसऱ्यांदा नगरसेविका, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या सिमा सावळे यांनीसुध्दा सुरवातीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे संधी मागितली होती. आमदार बनसोडे यांचा पराभव करायचाच तर तोडिस तोड म्हणून सावळे यांचे नाव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतूनही आघाडीवर होते. वाटाघाटीत कुठेतरी माशी शिंकली आणि त्यांचीही संधी गेली. शिंदेंच्या शिवसेनेतून खासदार बारणे यांचे समर्थक जितेंद्र ननावरे उमेदवारी मागत होते. प्रत्यक्षात साहेबांच्या राष्ट्रवादीत सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी मिळाली. आता चाबुकस्वार यांनी आणि शिंदे शिवसेनेच्या ननावरे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेला जिंकण्याची सुवर्ण संधी होती, पण मेरीट बाजुला ठेवून उमेदवारी दिली. अक्षरशः खेळखंडोबा झाला. दोन्ही शिवसेनेची नांगी शरद पवार यांनी ठेचली. अशा प्रकारे शहरातूनच शिवसेना हद्दपार झाली.

२०२५ मध्ये जनगणना होणार. ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचा न्यायालयात रखडलेला निकाल लागणार. नंतर पुन्हा मतदारसंघांची फेररचना होणार. या परिस्थितीत दोन वर्षे महापालिका निवडणुका होण्याची सुतराम शक्यता नाही. सत्ता हातात नसेल तर कार्यकर्ते दुसरा मार्ग शोधतात. गर्भगळीत झालेल्या शिवसैनिकांना वाली नसल्याने दोन वर्षे ते कळ धरतील याची शाश्वती नाही. आकुर्डीचे शिवसेनाभवन ओस पडले. साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात कोणी शिवसैनिक झोकून देऊन काम करेल असे काही राहिलेले नाही. म्हणूनच म्हटले, वाटाघाटीत शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेचा खात्मा झालाय. जय महाराष्ट्र!!! म्हणायलाही कोणी शिल्लक नाही.