वायसीएम रुग्णालयात मतदान जनजागृती

0
25

पिंपरी, दि. 29 (पीसीबी) : वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांनी रुग्णसेवा करण्याबरोबरच मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून लोकशाही सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार यांनी केले.

२०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. आज ७५० खाटांच्या सुसज्ज अशा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी संजीव भांगले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा सविता निगडे, लेखापाल गौरी जानराव, काँप्युटर ऑपरेटर स्मिता जोशी, विद्या बरके, तसेच चाणक्य कार्यालयातील किशोर पोपटानी, भगवान दाभाडे, सचिन कांबळे, सुशांत जोशी, सुषमा जाधव, मीना पालकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ घेऊन१०० टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असे एकूण ७५० पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग आहे. शासकीय, महानगरपालिकेच्या उपक्रमांना दर वेळेस सर्वांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असतो. वैद्यकीय सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेत असून देखील सर्व कर्मचारी सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होत असतात ही समाधानाची बाब आहे असे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले.

कोट-

२०६, पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात मतदारांची संख्या ३,८७,९७३ इतकी असून या मतदारसंघात निगडी, चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी व बोपखेल या ठिकाणांचे क्षेत्र येत असून पिंपरी विधानसभा हद्दीमध्ये संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे या भागातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे. त्याठिकाणी मतदानाची शपथ देऊन जनजागृती करण्यात आली शिवाय येथे दररोज हजारोंच्या संख्येने येणारी रूग्णसंख्या विचारात घेऊन त्यांचे माहितीसाठी निवडणूकीची तारीख व वेळ याबद्दल माहिती देणारे सूचक फलक लावण्यात आलेले आहेत.

-अर्चना यादव, निवडणूक निर्णय अधिकारी