चाकण, दि. 28 (पीसीबी) : गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणीला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तिच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 27) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे करण्यात आली.
चाकण येथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यासह विशाल मोहिते (रा. पांगरी, ता. खेड), मयूर रासकर (रा. शिक्रापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे एक तरुणी गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती आमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तरुणीला ताब्यात घेतले. तिच्याकडून 18 किलो 624 ग्रॅम गांजा एक मोबाईल फोन असा एकूण नऊ लाख 41 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी तरुणीने हा गांजा विशाल मोहिते आणि मयूर रासकर यांच्याकडून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.