पिंपरी, दि. 28 (पीसीबी) : अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली. तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, महाळुंगे एमआयडीसी, देहूरोड आणि पिंपरी पोलीस ठाण्यात पाच गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पाच पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई रविवारी (दि. 27) रात्री दहा वाजताच्या सुमारास महाळुंगे मधील एचपी चौकात करण्यात आली.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (दि. 26) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास मंत्रा सिटी रोड तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
साई चौक देहूरोड येथे गुन्हे शाखा युनिट चारने कारवाई करत एका सोळा वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे रिवॉल्वर आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 26) रात्री साडेदहा वाजता करण्यात आली. पिंपरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई रविवारी (दि. 27) सायंकाळी सव्वा सहा वाजता शेवाळे सेंटर जवळ पिंपरी येथे करण्यात आली.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बधलवाडी ते मिंडेवाडी या रस्त्यावर कारवाई करत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई रविवारी (दि. 27) सायंकाळी सव्वा सहा वाजता करण्यात आली