मुंबई, दि. 28 (पीसीबी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे सध्या ते सर्वत्र चर्चेत आहे. एका युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. सर्वप्रथम ते मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं, त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळालाही अभिवादन केलं. त्यानंतर ते अर्ज भरण्यासाठी निघाले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते.
उमेदवरी जाहीर झाल्यापासून अमित ठाकरे हे चांगलेच अॅक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहे. ते मतदारसंघात फिरतानाही दिसले, लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच, त्यांनी काका उद्धव ठाकरेंबाबतही अनेक वक्तव्ये केली. त्यापैकीच एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कधी एकत्र यावं का त्यावर अमित ठाकरेंनी जे उत्तर दिलं त्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. साम या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, मी आजारी असतानाना त्यांनी आमचे ६ नगरसेवक फोडले. तेव्हा त्यांना काही वाटलं नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी विचारला. पुढे ते म्हणाले की, दोन भाऊ एकत्र यावे हे मला आधी वाटत होतं. पण, या प्रकरणानंतर ते माझ्या डोक्यातून पूर्णपणे निघून गेलं आहे. आता मला अजितबात त्यांनी एकत्र यावं असं वाटत नाही. माझ्यासाठी तो विषय आता संपलेला आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
यापूर्वीही अमित ठाकरेंनी याबाबतचा उल्लेख केला होता. अमित ठाकरे हे म्हणाले होते की, २०१७ मध्ये मी आजारी असताना उद्धव ठाकरेंनी मनसेने ६ नगरसेवक फोडले होते. शिवसेनेने तेव्हा सात पैकी सहा नगरसेवक फोडले होते. तेव्हा मी आजारी होतो. हे खोके खोके बोलतात, त्यांनी त्यावेळी किती खोके दिले हे मला माहिती आहे. ते कसे आहेत हे मला तेव्हाच कळलेलं, तेव्हापासून त्यांच्यापासून लांब राहायचं ठरवलं, असं अमित ठाकरेंनी सांगितलं होतं.