सरळ लढतीत महायुती समोर आघाडीचा निभाव लागणार का ? थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
3

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात महायुती विरोधात महाआघाडी अशी दुरंगी लढत होणार असल्याचे आता निश्चित आहे. महायुतीत भोसरीतून भाजपचे आमदार महेश लांडगे, पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि चिंचवडमधून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप रिंगणात आहेत. महाविकास आघाडीत तीनही मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरीतून अजित गव्हाणे, पिंपरीतून सुलक्षणा शिलवंत-धर आणि चिंचवडमधून राहुल कलाटे उमेदवार आहेत. शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेची दीड लाखावर मतपेटी असूनही त्यांना एकही जागा मिळालेली नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आहेत, मात्र संघटनेची ताकद तोळामासा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख सचिन भोसले हे पिंपरीतून बंडखोरीच्या तयारीत आहेत. भोसरीत शिवसेना महिला आघाडीच्या सुलभा उबाळे आणि नव्याने पक्षात आलेले रवी लांडगे नाराज असल्याने त्यांची भूमिका महत्वाची असेल. चिंचवडमध्ये ठाकरेंची शिवसेना ५० हजार मतांची धनी होती आता कलाटे हेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेल्याने तिथेही कुंकवालाही कोणी धनी उरलेला नाही. मोरेश्वर भोंडवे उमेदवारीच्या आशेने आले होते पण, त्यांचा भ्रमनिरास झाल्याने ते शिवसेनेत राहतील याची शाश्वती नाही. तीनही मतदारसंघात काही अंशी बंडखोरीची थोडिबहुत हवा आहे, पण त्याचा नेमका परिणाम काय होईल त्याचे भाकित आताच करता येणार नाही. चिंचवडमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे हे दोन प्रबळ नेते कोणत्याही परिस्थितीत लढणार आहेत. भोसरी आणि पिंपरीत आज तरी सरळ लढत दिसते.

महायुतीने आठवड्यापूर्वीच उमेदवारांची नावे जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा कोणत्या पक्षाची आणि उमेदवार कोण यावर दहा दिवस घोळ सुरू होता. युतीने पहिल्या टप्प्यात प्रचारात मोठी मजल मारली. विकास आघाडीत अजूनही तेच ते नाराजी नाट्य कायम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची शहरात किमान दीड-दोन लाख मतांची ताकद कायम असूनही त्यांना एकसुध्दा जागा वाट्याला आलेली नाही. काँग्रेसने वारंवार मागणी करूनही त्यांचा साधा विचारसुध्दा महाविकास आघाडीत झाला नाही. महायुतीत पहिल्याच दिवशी सगळेजण एक झाले. पत्रकार परिषद घेत त्यांनी आम्ही सर्व संघटीत असल्याचा किमान देखावा केला आणि कामालाही लागले. आता वीस दिवसांच्या प्रचारात कोण किती पळतो, प्रचारात काय काय मुद्दे येतात ते पहायचे. दहा वर्षांत जगताप, लांडगे, बनसोडे या तीन आमदारांनी शहरात कोण कोणते पकल्प आणले, किती निधीची कामे झाली त्याचा लेखाजोखा लोक मागत आहेत. दहा वर्षांत भ्रष्टाचार दुप्पट झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. लोक कोणाला कौल देतात ते पहायचे.

चिंचवडमध्ये कलाटे चौथ्यांदा रिंगणात –
शहरात चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक राजकीय घडामोडी झाल्या. जगताप कुटुंबाच्या विरोधात प्रथम भाजपमधून विरोधी आवाज आला. माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी राजीनामा दिला. शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, राम वाकडकर यांनी बंडाचे हत्यार उपसले आणि शेवटी ते पेल्यातलेच वादळ ठरले. विरोध असताना शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात कोण यावर आठवडाभर खल सुरू होता. तीन वेळा निवडणूक लढविलेल्या राहुल कलाटे यांना संधी मिळाली. ठाकरेंच्या शिवसेनेतून साहेबांच्या राष्ट्रवादीत उडी घेत कलाटे यांनी उमेदवारी मिळवली. नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, चंद्रकांत नखाते आदी सर्वांनी आपापल्या पध्दतीने उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. आता प्रश्न राहुल कलाटे हे जगताप यांचा पाडाव कसा करतात की पुन्हा चितपट होतात तो आहे. २०१४ ची निवडणूक कलाटे यांनी शिवसेनेकडून लढवली. २०१९ मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी मिळून पाठिंबा दिला होता म्हणून अपक्ष कलाटे यांना १ लाख १२ हजार मते होती. नंतर २०२२ च्या पोटनिवडणुकित बंडखोरीवर त्यांना ४५ हजार मते मिळाली. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व इच्छुक जर का कलाटे यांच्या मागे एकत्र आलेच तर, निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने लागेल. भाऊसाहेब भोईर आणि नाना काटे हे कोणत्याही परिस्थिती लढायच्या तयारीत असल्याने नेहमीप्रमाणे मतविभागणीचा फायदा जगताप यांनाच होऊ शकतो. साडेसहा लाखाचा हा मतदारसंघ असल्याने सरासरी ६० टक्के मतदान झालेच तर विजयासाठी किमान दीड पावणे दोन लाख मतांची गोळाबेरिज झाली पाहिजे. जगताप यांच्यासाठी भाजप, दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेने बऱ्यापैकी मोट बांधली आहे. कलाटे दीड लाख मतांचे गणित कसे जमवतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भोसरीत महेश लांडगे हॅट्रीक करणार ? –
भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे अशी दुरंगी लढत होणार. लांडगे यांनी पहिल्याच फेरिला प्रचारात बऱ्यापैकी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीत नुकतेच शिवसेनेत आलेले रवी लांडगे यांना मिळणार, अशी चर्चा सुरू झाल्याने अजित गव्हाणे यांच्या चालत्या गाड्याला खीळ बसली. केवळ उमेदवारीसाठीच आठ दिवस त्यांना मुंबईत आठवडाभर तळ ठोकून बसावा लागला. आमदार लांडगे यांच्यावर भाजपांतर्गत जी नाराजी आहे त्याचाच सर्वाधिक फायदा गव्हाणे यांना मिळू शकतो. भाजपची एक मोठी फळी न बोलता गव्हाणे यांच्या मागे उभी आहे. आमदार लांडगे यांनी पहिल्यापासून प्रचारात आक्रमक शैली अवलंबली त्यामुळे हवा केली. दहा वर्षांत केलेल्या कामांची जाहीरातबाजी त्यांनी केली. नियोजित कामांचाही प्रचारात गवगवा सुरू आहे. गव्हाणे यांनी भाजपच्या सत्ता काळातील भ्रष्टाचाराची काही प्रकरणे काढली आणि वाजवली. मतदारांना अजून तो प्रचार भिडलेला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद गव्हाणे यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली तर त्यांचा मार्ग सुकर होईल. भोसरीची कुस्ती रंगदार, अटीतटीची होईल. आमदार महेश लांडगे हॅट्रिक करणार की त्यांचा टांगा पलटी होणार ते २३ तारखेला समजेल.

पिंपरीत आमदार बनसोडेंची सत्वपरिक्षा –
पिंपरी राखीव मतदारसंघात दोन राष्ट्रवादीत सरळ लढत दिसते. अजितदादांकडून आमदार बनसोडे आणि साहेबांच्या राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिववंत-धर आमने सामने आहेत. बनसोडे यांचे दहा वर्षांत कुठलेही काम नाही, ते मतदारांना भेटत नाहीत, पक्षाच्या कुठल्याच बैठका, कार्यक्रमांना नसतात, कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत आदी असंख्य तक्रारी होत्या. पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह २७ प्रमुख पदाधिकार्यांनी नाराजी दर्शविली होती. पराभव संभवतो, असे सर्वांचे सर्वेक्षण अंदाज असतानाही अजित पवार यांनी त्यांनाच उमेदवारी दिली. दादांचा आमदार पाडायचा तर विरोधात सिमा सावळे या तोडिस तोड उमेदवार होत्या. सावळे यांनी तीन महिन्यांत मतदारसंघ पिंजून काढला आणि बनसोडे यांच्या पराभवाचे वातावरण तयार केले होते. प्रत्यक्षात उमेदवारी सुलक्षणा शिलवंत यांच्या पदरात पडली. शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे आणखी प्रबळ दावेदार होते. आता ते अपक्ष लढणार असल्याने महाविकास आघाडीत फूट पडली. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेससुध्दा शिलवंत यांच्या मागे ठामपणे उभी राहणार नसेल तर त्यांचे कठिण आहे. तीन वेळा महापालिका आणि तीनदा आमदारकीची निवडणूक लढविलेल्या बनसोडे यांचे निवडणूक जिंकण्याचे तंत्र, मंत्र सगळेच वेगळे आहे. तिथे सिमा सावळे यांचाच उतारा लागू पडला असता, शिलवंत यांचा निभाव लागतो की नाही ते आता काळच ठरवेल.