सांगली, दि. 28 (पीसीबी) : सांगली विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळली आहे. काँग्रेसने उमेदवारी डावलल्यानंतर नाराज झालेल्या काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जयश्री पाटील उद्या आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जयश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस नेते जयश्री पाटील यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगली विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री पाटील या काँग्रेसकडून इच्छुक असतानाही त्यांना डावलून पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने जयश्री पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. जयश्री पाटील यांनी आज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी सांगलीतून काँग्रेस विरोधात अर्ज दाखल करत बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आता थेट पक्षाविरोधात बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. जयश्री पाटील यांच्या भूमिकेमुळे मात्र काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी पदांचे सामूहिक राजीनामे देण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीतील चारही जागा दिल्याने काँग्रेसमध्ये असंतोष उफाळला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पक्षश्रेष्ठींनी दोन दिवसांत कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या जागांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पक्षाचे काम पुढे करायचे की नाही यावर विचार केला जाईल.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष, काँग्रेस युवा अध्यक्ष, सरचिटणीस, सेलचे अध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्ते दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आपले राजीनामे काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना सोपवणार आहेत. याशिवाय, सचिन पोटे यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, ज्यामुळे काँग्रेसमध्ये तणाव आणखीनच वाढला आहे.