मोठी बातमी! पुण्यात प्रतिष्ठेची लढत; रवींद्र धंगेकर यांना भाजपचा हा उमेदवार देणार फाईट

0
80

पुणे, दि. 26 (पीसीबी) : पुणे शहरातील कसबा पेठेतील पोटनिवडणूक राज्यभर गाजली होती. भारतीय जनता पक्षाच्या या पारंपारीक मतदार संघात काँग्रेसने सुरुंग लावले होते. भाजपने प्रचारात ‘हू इज धंगेकर?’, असा प्रचार विधानसभा पोटनिवडणुकीत केला होता. त्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी आता भाजपला जोर लावावे लागणार आहे. या मतदार संघात भाजपने रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात हेमंत रासने यांनाच उमेदवारी दिली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव आले आहे.

कसबा पेठे हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तब्बल 25 वर्षांहूनही अधिक काळ भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून येत होते. या मतदारसंघातून स्व.मुक्ताताई टिळक, स्व. गिरीश बापट, स्व.अण्णा जोशी, स्व.डॉ अरविंद लेले यांनी प्रतिनिधित्व केले आहे. या ठिकाणी असलेल्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यामुळे 2023 मध्ये या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपच्या पारंपारीक मतदार संघात पक्षाने ब्राम्ह्यण समाजाचा उमेदवार न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे हा समाज नाराज होता. पुण्यात बॅनर लागले होते. त्यात म्हटले होते की, . ‘कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का?’

कसबा पेठेत ब्राम्ह्यण समाजाची नाराजी पाहून हेमंत रासने यांच्या विजयासाठी भाजपने पोटनिवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अख्खे मंत्रिमंडळ प्रचाराला आले होते. त्यानंतर रवींद्र धगेंकर यांचा 11 हजार मतांनी विजय झाला होता. रवींद्र धंगेकर यांना 73,309 मते मिळाली होती. हेमंत रासने यांना 62,394 मते मिळाली होती. आता कसबा पेठेतील गेलेली जागा पुन्हा मिळवण्याचे आव्हान भाजपकडे आहे. हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून जोरदार लढत मिळणार आहे. यंदा भाजपचा पारंपारीक मतदार पुन्हा पक्षाकडे येणार का? हे आता 23 नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.