अबब…… प्रताप सरनाईक यांच्याकडे एवढ्या कोटींची संपत्ती? आकडा ऐकून थक्क व्हाल…

0
43

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये गणल्या जाणाऱ्या ओवळा-माजिवडा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढल्याचे समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी सरनाईक यांनी १२५ कोटींपर्यंत संपत्ती असल्याची माहिती सादर केली होती. गेल्या पाच वर्षात सरनाईक यांच्या संपत्तीमध्ये घसघशीत भर पडली असून ही संपत्ती २७० कोटींपर्यंत पोहचल्याचे निवडणूक आयोगाकडे दाखल प्रतिज्ञापत्रातुन समोर आले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या नरेश मणेरा यांची संपत्ती २७ कोटी इतकी आहे.

ओवळा-माजिवडा मतदार संघातून प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये २०२३-२४ चे उत्पन्न २ कोटी ९ लाख ५७ हजार तर पत्नीचे उत्पन्न २९ लाख ९० हजार ८०० इतके दर्शवले आहे. सरनाईक यांचे वय ६० वर्षे असून त्यांची जंगम मालमत्ता ५६ कोटी ३० लाख ९७ हजार २८३ इतकी तर स्थावर मालमत्ता २१४ कोटी ९७ लाख ४२ हजार ३६४ असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांची जंगम मालमत्ता ४४ कोटी ३८ लाख ५५ हजार ४६६ इतकी तर स्थावर मालमत्ता १७ कोटी ६६ लाख इतकी आहे. निलेश राणे कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडून येणार, शिवसेना शिंदे गटात उद्या प्रवेश

सरनाईक यांच्यावर १९४ कोटी ४३ लाख २३ हजार ७०९ रुपयांची देणी असून पत्नी परिषा यांची देणी ५ कोटी ५६ लाख ८ हजार ४९६ इतकी आहेत. २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये सरनाईक यांनी २१ कोटी ८९ लाख ६९ हजार १६३ रुपयांची जंगम आणि १०४ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपयांची स्थावर मालमत्ता दर्शवली होती. या तुलनेत त्यांची संपत्ती पाच वर्षांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय त्यांची देणी २०१९ मध्ये ११० कोटी ९६ लाख ५८ हजार इतकी होती त्यामध्येही दुपटीने वाढ होऊन १९४ कोटी ४३ लाख २३ हजार इतकी झाली आहेत. हॉटेल व्यवसाय, बांधकाम व्यवसाय अशा माध्यमातून त्यांनी ही संपत्ती मिळाल्याचे म्हटले आहे. सरनाईक यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाकडून नरेश मणेरा यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांची जंगम मालमत्ता ३ कोटी ६१ लाख तर स्थावर मालमत्ता २४ कोटी ६ लाख अशी एकुण २७ कोटींच्या आसपास आहे. नरेश मणेरा यांचे शिक्षण बारावी पास असून मालमत्तांचे भाडे आणि इन्व्हेस्टमेंटमधून उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.