मोठी बातमी! महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 52 कोटींची मालमत्ता जप्त

0
39

मुंबई, दि. 25 (पीसीबी) : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील १९ अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी पोलिस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.

दिवसभरात झालेल्या कारवाईमध्ये नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमधल्या मोठ्या कारवायांचा समावेश आहे. ह्यातून निवडणूक यंत्रणा दक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश गेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या मागील धागेदोरे तपास काढून गुन्ह्याची साखळी मोडून काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्व मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सी व्हिजील ॲपवर तक्रार करता येते. ह्या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

गेल्या 9 दिवसांत विविध यंत्रणांनी कारवाईतून जप्त केलेली रक्कम

इन्कमटॅक्स डिपार्टमेंन्ट – 30 कोटी 93 लाख 92 हजार 573
रेव्हयून्यू इन्टेलिजन्स – 8 कोटी 30 लाख 84 हजार 878
राज्य पोलीस डिपार्टमेंट – 8 कोटी 10 लाख 12 हजार 811
नार्कोटिस्ट कंन्ट्रोल ब्युरो – 2 कोटी 50 लाख
राज्य उत्पादन शुल्क विभाग – 1 कोटी 75 लाख 392
कस्टम डिपार्टमेंट – 72 लाख 65 हजार 745
प्राप्तीकर विभागाचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत

धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल. या नियंत्रण कक्षाकडे नागरिक १८००२२१५१० हा टोल फ्री क्रमांक ८९७६१७६२७६ आणि ८९७६१७६७७६ या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर प्राप्तीकर विभागाद्वारे जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.