बिष्णोई टोळीतील चौघे पुण्यातून ताब्यात

0
3

पुणे, दि. 24 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पुण्यमधून आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यातील कर्वेनगर भागात रचला गेल्याचे तपासात समोर आले आहे.

रुपेश राजेंद्र मोहोळ (वय २२, रा. शिवणे), करण राहुल साळवे (वय १९, रा. उत्तमनगर), शिवम अरविंद कोहड (वय २०, रा. उत्तमनगर), रियान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. यातील मोहोळ, साळवे, कोहड यांना अटक करण्यात आली आहे. शेख याच्याकडे चौकशी सुरू आहे. या प्रकरणात यापूर्वी लाॅरेन्स बिष्णोई टाेळीशी संबंध असल्याच्या आरोपातून प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली होती. त्याचा भाऊ शुभम हा पसार झाला आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी त्याच्या संपर्कात असल्याचे मुंबई पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून लोणकरसह धर्मराज कश्यप, गुरुनील सिंग यांना देखील अटक करण्यात आली आहे.

प्रवीण लोणकर कर्वेनगर भागात डेअरी चालवायचा. प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम समाज माध्यमांतून बिष्णोई टोळीतील सराइतांच्या संपर्कात होते. सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कातही प्रवीण आणि शुभम होते. बिष्णोई टोळीला पिस्तूल पुरविल्याप्रकरणी शुभमला अकोला पोलिसांनी अटक केली होती. कर्वेनगर भागातून बुधवारी ताब्यात घेण्यात आलेले चौघे जण शुमभच्या संपर्कात होते.