मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तगडा उमेदवार ठरला

0
44

ठाणे, दि. 23 (पीसीबी) :विधानसभा निवडणुकांच्या धुरळ्यात मोठी राजकीय बातमी ठाण्यातून आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे. त्यानुसार कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदेंविरोधात ठाकरे गट आनंद दिघे यांच्या पुतण्यालाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. दिघेंचे पुतणे केदार दिघे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत.

कोपरी पाचपाखाडी विधानसभेत मशाल विरुद्ध धनुष्यबाण लढत निश्चित मानली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गट संधी देण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी होईल. कारण ठाकरे गटाकडून शिंदे हे दिघेंच्या वारसदारांना विरोध करत असल्याचा प्रचार केला जाऊ शकतो.

दुसरीकडे, ठाणे शहर विधानसभेसाठी माजी खासदार राजन विचारे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेत पराभव झाल्याने ठाकरेंकडून विचारे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे ठाणे शहर विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. तर ओवळा माजिवाडा मतदारसंघात ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मनेरा यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.

ठाण्यात राजकीय कुरघोड्या
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्यातच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोड्यांना ऊत आला आहे. या भागात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा आमदार संजय केळकर यांना रिंगणात उतरवल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आवाज’ उठवला आहे. तर कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध मैदानात उतरण्याचा भाजपच्या माजी लोकप्रतिनिधीने इशारा दिला आहे. दुसरीकडे मविआने ठाणे शहर येथून उमेदवार जाहीर केला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) स्थानिक नेत्यांनी या मतदारसंघावर दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपने पहिल्या यादीतच ठाणे शहर येथून संजय केळकर यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेतून त्यांच्या नावाला जाहीर विरोध करण्यात आला. यामध्ये सुरुवातीपासूनच बंडाचे निशाण हातात घेतलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे व माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी उघडपणे केळकर यांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत त्यांचे काम न करण्याचा थेट इशारा दिला आहे.