चिंचवड मधून सतीश काळे रणांगणात: मराठा क्रांती मोर्चातून तयारी

0
3

चिंचवड, दि. 22 (पीसीबी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचा आवाज घुमणार आहे. या मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांच्या नावाची चर्चा आहे. मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्‍यांच्‍या नावाची चर्चा होत आहे. काळे विधानसभा निवडणुकीत उतरल्‍यास मराठा समाजाचा मोठा वर्ग त्‍यांच्‍या पाठीमागे उभे राहिल,अशी चर्चा आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्‍याची मोठी घोषणा केली आहे. त्‍यामुळे प्रस्‍थापीत लोकप्रतिनिधींच्‍या पायाखालची वाळू सरकली आहे.जरांगे पाटील यांच्‍या घोषणेनंतर राज्‍यभरातून विविध पक्षातील नेते,पदाधिकारी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करत आहेत.मराठा समाजाचा निवडणुकीत मोठा प्रभाव दिसणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील त्‍याचा प्रभाव स्‍पष्ट होणार असल्‍याचे चित्र आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्‍थापित पक्षातील मोठे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. विधानसभा निवडणुकीत पाठिंबा मिळविण्यासाठी त्‍यांची धडपड सुरू आहे. त्‍यांच्‍यासह आता मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे यांच्‍या नावाची देखील मोठी चर्चा सुरू झाली आहे. चिंचवड विधानसभेतून ते उमेदवार असतील. या मतदारसंघात मराठा समाजासह एससी,ओबीसीसह इतर सर्वच समाजात त्‍यांचा मोठा संपर्क आहे. ते उभारल्‍यास त्‍याचा नेमका कोणाला फटका बसेल हे निवडणुक निकालानंतर स्‍पष्ट होणार आहे.

सतिश काळे यांचा परिचय-
काळे हे मुळ मराठवाड्यातील असुन काळे यांचा पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या मराठवाड्यातील बांधवांच्या सुखदुःखात सहभागी असतात. यामुळे शहरात राहणाऱ्या मराठवाड्यातील मतदारांचा काळे यांना पाठिंबा मिळू शकतो,अशी राजकीय चर्चा आहे. काळे हे संभाजी ब्रिगेडचे गेल्या वीस वर्षापासून काम करत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व बहुजन मतदारांचा काळे यांना फायदा होऊ शकतो. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी काळे यांना येरवडा जेलवारी पण झाली आहे. काळे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने केले आहेत. मराठा आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून त्‍यांच्‍या पुढाकाराने मोठा मोर्चा देखील आयोजित करण्यात आला होता.