कुणाचा कपडा, कुणाची चप्पल घेतली म्हटलं तर चप्पल तोंडावर फेकून मारेल – मनोज जरांगेचा इशारा

0
3

अंतरवाली सराटी, दि. 22 (पीसीबी) : निवडणुका असल्याने अनेकजण आपल्या नावाचा वापर करू शकतात. आपल्या नावाने पैसे गोळा केली जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी असले प्रकार होऊ नये म्हणून सज्जड दम दिला आहे. कोणी जर माझ्या नावाखाली पैसे गोळा करत असेल तर त्या लोकांचे पैसे वर्गणी काढून परत करण्यात येईल. कुणाचा कपडा घेतला म्हटलं, कुणाची चप्पल घेतली म्हटलं तर चप्पल तोंडावर फेकून मारेल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. माझ्या नावाचा वापर करणारे कोण लोकं आहेत, हे मला माहीत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सर्वच पक्षाचे उमेदवार मला भेटायला येत आहेत. आम्हाला त्याचं काही वाटत नाही. सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा आम्ही सन्मान करतोय. पण आमचं जे ठरलं आहे, तेच आम्ही करणार आहोत. आम्ही आता मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. एकाच मतदारसंघात एकच उमेदवार द्यायचं ठरलं आहे. मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण सर्वांनीच निवडणुकीचे अर्ज भरले तर योग्य होणार नाही. त्यामुळे एका व्यक्तीने एकच अर्ज भरा. आपल्याला आपली ताकद दाखवायची आहेच. पण शिस्तही दाखवली पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5-6 दिवसांत कळेल कोणते कोणते मतदारसंघ लढायचे. आम्ही 24 तारखेला इच्छुकांना बोलवलं आहे. जो बैठकीला येणार नाही, त्याने स्वत:ला गृहित धरू नये. तुम्ही बैठकीला येणार नाही आणि फॉर्म भरणार असं कधी होणार नाही. हे मान्यच होणार नाही. त्यामुळे ज्यांना अर्ज भरायचे आहेत, त्यांनी बैठकीला आलंच पाहिजे, असंही ते म्हणाले. एका मतदारसंघात एकच फॉर्म राहील. बाकीचे काढून घेतले जातील. एखाद्या मतदारसंघात फॉर्म ठेवण्यात आला तर त्याने मुद्दाम फॉर्म ठेवला आणि मॅनेज झाला, त्याला मराठ्यांशी काही देणे घेणे नाही, आरक्षणाच्या मागणीशी काहीही देणेघेणे नाही, त्याला कोण्यातरी पक्षासाठी मते खायचे आणि विभाजन करायचे, असा त्याचा अर्थ घेतला जाईल. मी आज आणि उद्या कोणते उमेदवार द्यायचे याची यादी करत आहे, पण डिक्लेअर करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.