पुण्यात ५ कोटींचं घबाड सापडलं; संजय राऊत म्हणाले, ‘काय झाडी.. काय डोंगर..’

0
3

पुणे, दि. 22 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नाक्या-नाक्यांवर, गल्लीबोळात सर्वत्र पोलिसांचे बारीक लक्ष आहे. त्यातच काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमाचा एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत पुण्यात खेड-शिवापूर परिसरातून जप्त करण्यात आलेल्या रक्कमेबद्दलची माहिती पाहायला मिळत आहे. त्यावर आता संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतील एका आमदाराची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे तो आमदार कोण याचाही उल्लेख त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला आहे.

“मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात पोलिसांना रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहनातील रोख रक्कम जप्त केली. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गाडीत पोलिसांना जवळपास 5 कोटींची रोख रक्कम मिळाल्याचे बोललं जात आहे.