अल्‍पवयीन मुलीस पळविणार्‍यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले

0
6

बावधान पोलिसांच्‍या बीट मार्शलची कामगिरी

बावधन, दि. 21 (पीसीबी) : लग्‍नाचे अमिष दाखवून एका १४ वर्षीय मुलीला मध्‍यरात्री अडीच वाजताच्‍या सुमारास जाधववाडी चिखली येथून पळवून नेले. याबाबत वायरलेसवरून संदेश मिळताच बावधन पोलिसांच्‍या बीट मार्शलने शिरवळपर्यंत पाठलाग करीत त्‍या मुलीची सुटका केली.

वसीम अब्‍दुलकरीम शहा (वय २२, रा. कोहिनूर कॉलनी, रुपीनगर, जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३३ वर्षीय नातेवाईकाने याबाबत चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी पहाटे अडीच वाजताच्‍या सुमारास फिर्यादी यांच्‍या नातेवाईक असलेल्‍या १४ वर्षीय मुलीस आरोपी वसीम याने लग्‍न आणि संसाराचे आमिष दाखवून (एमएच १४ केए ६५४८) या टेम्‍पोतून पळवून नेले. ही बाब नातेवाईकांच्‍या लक्षात येताच त्‍यांनी चिखली पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिखली पोलिसांनी आरोपीच्‍या टेम्‍पोचा नंबर व माहिती वायरलेस द्वारे सर्व पोलीस ठाण्‍यांना कळविली.

दिलेल्‍या माहितीचा टेम्‍पो बावधन पोलिसांच्‍या बीट मार्शलाला दिसला. त्‍यांनी टेम्‍पोचा पाठलाग सुरू केला. मात्र टेम्‍पो वेगात असल्‍याने तो हाती लागला नाही. शिरवळ येथे रस्‍त्‍याचे काम सुरू असल्‍याने या ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्‍यावेळी बावधन पोलिसांनी टेम्‍पोला आपली दुचाकी आडवी घालून आरोपीला ताब्‍यात घेतले. तसेच अल्‍पवयीन मुलीची सुटका केली. या कामगिरीबाबत चिखली पोलिसांच्‍या समयसूचकतेचे आणि बावधन पोलिसांच्‍या बीट मार्शलचे सर्वत्र कौतुक होत आहे.