पोत्यानं पैसे घ्या, दिवाळी साजरी करा…..; मतदानाच्या दिवशी त्यांचं दिवाळ काढा – दिलीप खोडपेंचा गिरीश महाजनांवर घणाघात

0
3

जळगाव, दि. 21 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे इच्छुक उमेदवार दिलीप खोडपे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका केली आहे. दिलीप खोडपे हे जळगावच्या जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. कार्यकर्त्यांना गिरीश भाऊंचं तोंड तरी कधी दिसायचं का? त्यांचे ठराविक बगलबच्चेच मागे- पुढे असायचे. बगल बच्चे इतके भारी की, चहा पेक्षा किटली गरम… आता आपल्याला या किटली सुद्धा थंड करायची आहे आणि चहा सुद्धा घ्यायचा नाहीये. आता पण तुम्ही हायगाई करू नका. त्यांनी थोडी कष्टाने पैसा कमवलेला आहे. फुकटचा पैसा आहे. आता दिवाळी आहे. पोत्यानं पैसा येवू द्या. पैसे घेवून घ्या. दिवाळी साजरी करून आणि मतदानाच्या दिवशी त्यांचे दिवाळ काढा, असं दिलीप खोडपे म्हणालेत.

आधी ते निवडणूक मध्ये म्हणायचे तुम्हाला आमदार पाहिजे की सालदार… लोकांना असं वाटायचं वाव सालदारासारखं काम करणारा माणूस आहे. पण आता तुम्ही बघा सालदार दूर पण ते मालदार झाले आणि आपल्याला सालदार करून ठेवलं आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही काम करा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, असं म्हणत दिलीप खोडपेंनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

कोणतेही काम घेऊन जा ते होच म्हणतील. मात्र काम होणार नाही. ते आपलं आपल्यालाच करावं लागेल. जामनेर तालुक्यातील भागपूर प्रकल्पाचे काम रखडलं गेल्यावेळी ते म्हटले होते मी इंच आणि इंच जमीन ओली करेल. जमीन भिजली झाली मात्र पावसामुळे देव बाप्पाने भिजवली आहे. पाच वर्ष शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं मात्र शेतात पाणी आलं नाही. आता त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. म्हणून त्यांना तुमची आठवण होते, असं दिलीप खोडपे यांनी म्हटलं आहे.

गिरीश महाजन आता समाजात समाजाचे मेळावे घेत आहेत. मात्र इतके 30 वर्षात का समाज आठवले नाही. आता निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना कसा समाज आठवत आहे? मतांसाठी त्यांना समाज आठवत आहे. आपण तुतारी इतक्या जोरात वाजवायची आहे की तुतारीच्या आवाजाने त्यांनी कान झाकले पाहिजे. कान झाकता झाकता त्यांच्या हातातला कमळ सुटून गेलं पाहिजे. आपल्याला यावेळी मोठ्या मताधिक्याने तुतारी वाजवायची आहे, असं आवाहन खोडपे यांनी जामनेरकरांना केलं आहे.