विधानसभेच्या तोंडावर बीडमध्ये भाजपला मोठा धक्का; पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीयाचा भाजपला रामराम

0
54

बीड, दि. 21 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काल भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर काही उमेदवारांमध्ये आनंदाचे तर काहींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र म्हस्के यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात भाजपला उतरती कळा लागली आहे. राजेंद्र म्हस्के यांनी गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे.

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्याला सध्या उतरती कळा लागली आहे. राजेंद्र म्हस्के यांनी काल बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. “गेल्या ६ वर्षांपासून मी भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. बीड विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळेल, याच अनुषंगाने माझे काम सुरु आहे”, असे राजेंद्र म्हस्के म्हणाले.

“आचारसंहिता लागली. दोन दिवसांनी फॉर्म भरण्यास सुरुवात होईल. अशावेळाला पक्षातून कोणतीही विचारणा होत नाही. बैठका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष असूनही मलाच स्वत:ला नेमकं चाललंय काय असं विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी पक्षाच्या अनुषंगाने मी आज एक बैठक घेतली. त्या बैठकीत मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यापुढे मी पक्षाचे कोणतेही काम करणार नाही”, असे राजेंद्र म्हस्केंनी म्हटले.

“पदाचा सन्मान राखत पक्षासाठी मोठे परिश्रम घेतले. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर पक्ष नेतृत्वाने कामाची दखल घेतली नाही. उलट दुजाभाव केला. विरोधकांची मर्जी राखली. विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न झाले. सत्ता मिळूनही भाजपच्या निष्ठावंतांची गोची करण्याचे काम या अडीच वर्षांत झाले”, असेही राजेंद्र म्हस्केंनी म्हटले आहे