आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोंबर ला अर्ज दाखल करणार

0
42

मंचर, दि. 21 (पीसीबी) : सलग सात वेळा आमदार आणि २५ वर्षे मंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वात जेष्ठ नेते असलेले दिलीप वळसे पाटील २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मी माझ्या कामावर लढत असतो त्यामुळे समोर कोण उमेदवार आहे याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, वळसे यांच्या विरोधात देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून देवदत्त निकम हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. वळसे आणि निकम असा सामना रंगणार आहे.

संघर्ष टाळण्यासाठी स्वतः वळसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती मात्र, तोडगा निघाला नाही. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अन्य नेते अजित पवार यांच्या मागे गेले त्याचे नाही पण, सर्वात विश्वासू सहकारी म्हणून दिलीप वळसे पाटील हेसुध्दा फुटल्याची सल शरद पवार यांना आहे.  सलग नऊ वर्षे खासगी सचिव म्हणून वळसे पाटील यांनी शरद पवार यांची सूत्र सांभाळली. पुढे सात वेळा आमदार, कायम कॅबिनेट मंत्री असे देऊनही वळसे पाटील हे अजितदादांच्या मागे गेल्याने शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांनाही वाईट वाटले. पवार यांचे अगदी कौटुंबिक संबंध आणि जिव्हाळा असल्याने सर्व नेत्यांना वळसे फुटले याचे आश्चर्य वाटले. तब्बेत साथ देत नसल्याने संधी असूनही शिरुर लोकसभा निवडणूक लढविण्यास वळसे यांनी नकार दिला होता. विधानसभेसाठी यावेळी दुसरा एक पर्याय म्हणून त्यांची कन्या पूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या नावाचीही चाचपणी करण्यात आली होती.

आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाहिले जाते. अभ्यासू, संयत, सभ्य, सुसंस्कृत नेता अशी राज्याच्या मंत्रीमंडळातील त्यांची प्रतिमा आजही कायम आहे. वळसे यांचे एकेकाळचे सहकारी शिवाजीराव आढळराव पाटील हे मतदभेद झाल्याने शिवसेनेत गेले आणि सलग तीन वेळा खासदार झाले. लोकसभेला कोणी काही म्हटले तरी आढळराव यांना आणि विधानसभेला कितीही विरोधात प्रचार केला तरी वळसे पाटील यांना आंबेगावच्या जनतेने कौल दिलेला आहे. आता वळसे यांच्याच तालमित तयार झालेले दुसरे सहकारी देवदत्त निकम हे आव्हान देत आहेत. गेल्या ३५ वर्षांत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, अवसरी खुर्द येथे शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय, मंचर येथे जिल्हा आरोग्य केंद्र, सर्व रस्ते, पूल, गावोगावच्या विकास कामांचे श्रेय वळसे पाटील यांना जाते. आजवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसल्याने वळसे पाटील यांची अत्यंत स्वच्छ प्रतिमा मतदारांना भावते. ठाकरेंची शिवसेना वगळता तालुक्यात काँग्रेस किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद नाममात्र असल्याने वळसे हे आपले वर्चस्व कायम टिकवून आहेत. विरोधातील सर्व राजकीय ताकद एकवटली तरी त्यांचा पराभव सहज शक्य नाही.