उलट दिशेने आल्यास वाहन सहा महिने होणार जप्त; बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

0
58

पुणे, दि. 19 (पीसीबी) : पुणेकरांना शिस्त लावण्याचा वाहतूक शाखेकडून केला जातो, परंतु, दंड भरेन पण सुधारणार नाही, अशी वृत्ती ठेवून सर्रास वाहनचालक नियम मोडत असतात. अशा पुणेकरांना सरळ करण्यासाठी आता उलट दिशेने येणारी वाहने सहा महिने जप्त करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. ट्रिपल सिट, ड्रं अँड ड्राईव्ह आणि उलट दिशेने येणार्‍या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक शाखेने मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसात वाहतूक शाखेने सुमारे २५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

पुणे शहर वाहतूक शाखेमध्ये दोन शिफ्टमध्ये ८५० पोलीस अंमलदार कार्यरत असतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी बेशिस्त वाहनचालक, रस्त्यांची दुरावस्था, अरुंद रस्ते यामुळे शहरातील सर्वच भागात वाहतूक कोंडी दररोज होत असते. शहरात भरधाव आणि वाहतूकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दररोज एक ते दोघांना आपल्या प्राणास मुकावे लागते. अनेक जण गंभीर तर काही किरकोळ जखमी होत असतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

अवजड वाहनांना दिवसा बंदी-
शहरात विविध ठिकाणी इमारतीचे बांधकाम, आणि विकास कामे सुरु आहेत. त्यासाठी डंपर, कॉक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांची दिवसभर वाहतूक सुरु असते. त्यामुळे अनेकदा अपघात होताना दिसून येतात. त्यामुळे वर्दळीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

वाहतूक शाखेने १ ते १६ ऑक्टोबर दरम्यान केलेली कारवाई

उलट दिशेने जाणारे वाहनचालक – २१हजार २८५
ट्रिपल सीट – २ हजार ८७२
ड्रंक अँड ड्राईव्ह – ५७०
जप्त वाहने – २१५