मोठी बातमी! लढायचं की पाडायचं? मनोज जरांगे यांचा उद्या निर्णय

0
3

अंतरवाली सराटी, दि. 19 (पीसीबी) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अंतरवालीत मुलाखती घेतल्या आहेत. आता उद्या, रविवारी समाजबांधवांशी संवाद साधून ‘लढायचे की पाडायचे’ हा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील जवळपास १२० मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर ३५ ते ४५ जागा जिंकणे शक्य असल्याचा दावा प्रमुख कार्यकर्त्यांनी केला आहे.

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. मागील काही महिन्यात जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. जरांगे यांचा जनाधार घटल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, नारायणगड येथे दसरा मेळावा घेत जरांगे यांनी लाखो लोक आपल्यासोबत असल्याचे राज्याला दाखवले. या शक्तिप्रदर्शनानंतर पुन्हा जरांगे यांची भूमिका केंद्रस्थानी आली आहे. मराठवाड्यात राजकीय घडामोडीत त्यांचे स्थान मध्यवर्ती ठरत असून महायुतीच्या विरोधात जरांगे भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, अशी मागणी आहे. त्यानुसार जरांगे यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे गुरुवारी राज्यभरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

या मुलाखतीपूर्वी जरांगे यांच्याकडे आठशे उमेदवारांचे अर्ज आले होते. मुलाखतीच्या दिवशी जवळपास एक हजार इच्छुकांनी गर्दी केली होती. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आले होते. निवडणूक लढवण्याबाबत जरांगे यांनी सर्वांचे मत जाणून घेतले. बहुतांश इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची गरज व्यक्त केली. काही इच्छुकांनी निवडणूक लढवू नये. अन्यथा, सामाजिक आधार घटेल, असा मुद्दा मांडला. दोन्ही बाजू ऐकून घेत येत्या रविवारी समाजबांधवांना अंतरवालीत बोलावले आहे. त्यात ‘लढायचे की पाडायचे’ याचा निर्णय घेऊ, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.