मोठी बातमी! महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण, अमित शाहांच्या उपस्थितीत तिढा सुटला?

0
82

मुंबई, दि. 18 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. त्यासाठी काल मध्यरात्री महायुतीची बैठक पार पडली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्यासमोर जागावाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती आहे. जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटल्याची माहिती आहे. तर काही जागांवरचा तिढा मात्र कायम आहे, अशी माहिती आहे.

महायुतीतील काही जागांचा निर्णय कालच्या बैठकीत झाला नसल्याची माहिती आहे. मात्र त्या जागांचा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून तिथेच या जागांबाबतचा वाद सोडवण्याच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या आहेत. निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागण्याचे शाह यांनी निर्देश दिलेत. प्रचाराचे मुद्दे, जाहीरनामा आणि प्रचार सभा यावरही बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाची पहिली प्रचार सभा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात झाली आहे. अजित पवार आजपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. अजित पवारांची पहिली सभा आज नाशिकच्या त्रंबकेश्वरमध्ये होणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या आमदार हिरामण खोसकर यांच्यासाठी अजित पवार यांची आज पहिली सभा होणार आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात आज अजित पवारांची तोफ धडधडणार आहे. आज होणारी सभा ही प्रचार सभा नसून विजयी सभा असल्याचं हिरामण खोसकर यांनी म्हटलं आहे.

एकच घरात दोन उमेदवारी मागितल्या जात असल्याने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे. आहे. अहमदनगर जिल्ह्यात विखे-पाटील कुटुंबातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील हे सात वेळा आमदार आहेत. ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर त्यांचे पुत्र सुजय यांनीही संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लढण्याची तयारी केली आहे.सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र, भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे एकाच घरात दोन तिकीट महायुती- भाजप देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.