‘वेळ पडली तर मराठे भाजपचा एन्काउंटर करणार’ मनोज जरांगेचं आक्रमक वक्तव्य

0
53

अंतरवली सराटी, दि. 17 (पीसीबी) : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजपला मोठा इशारा दिला. “वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. “अजून काही ठरले नाही. इच्छुक वाढले आहेत. चर्चा केली. आपल्याला 95 टक्के समाजकरण आणि 5 टक्के राजकारण करायचे आहे. उमेदवारबद्दल चर्चा झाली. आपला बाप ( समाज ) 20 तारखेला येणार आहे, आणि तो बाप निर्णय घेणार आहे. शेती, आरक्षण, दलित मुस्लिम, गोरगरीब ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी सर्वांचे मते जाणून घेतली. उद्या कोणीही बोलु नये की, आम्हाला मते मांडू दिली नाहीत. आजपर्यंत 1800 उमेदवारी अर्ज आले आहेत, आणि आज पुन्हा काही अर्ज आले आहेत”, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

“ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम लावणार आहे. या मनस्थितीमध्ये फडणवीस यांनी जायला भाग पाडले. जो समाज त्यांच्या बाजूने होता त्यांची मुडदे फडवणीस यांनी पाडली. देशातील सर्वात डागी माणूस, आणि देशात पहिला आहे. न्यायाची अपेक्षा फडवणीस यांच्याकडून होती, पण त्यांनी विष आमच्या नारड्यात ओतले. फडवणीस यांनी जाताना खुन्नस दिली आणि मला मराठ्यांशी काही देणेघेणे नाही हे दाखवले. धनगर आरक्षणचा निर्णय फडवणीस यांनी घेतला आणि त्यांनी रद्द केला. वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”, असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षांना मोठा तोटा सोसावा लागला होता. यानंतर आता विधानसभेत मनोज जरांगे हे स्वत: मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक राजकीय पक्षांना धडकी भरली आहे. त्यामुळे अनेक आजी-माजी आमदारांनी आतापर्यंत मनोज जरांगे यांची अंतरवली सराटीत जावून त्यांची भेट घेतली आहे.