संतापजनक! ठाण्यात बदलापूरची पुनरावृत्ती, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0
6

बदलापूर, दि. 16 (पीसीबी) : काही दिवसांपूर्वीच राज्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीचे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आले आहे. अशात ठाण्यात आणखी एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलंय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडलीये. विशेष म्हणजे, विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन देखील मिळाला आहे.

चिमुकलीसोबत गैरवर्तन करणारा आरोपी शिंदे गटाचा उपविभागप्रमुख असून सचिन यादव असं त्याचं नाव असल्याची माहीती समोर आली आहे. ठाण्यातील भंडार आळी भागात एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य करण्यात आलंय. शिंदे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादववर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन दिल्यामुळे पीडित चिमुकलीच्या माता-पित्यांसह ठाण्यातील शेकडो महिलांनी या विरोधात संताप व्यक्त केला. या महिलांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तसेच, शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाला तत्काळ अटक करा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. त्याचवेळी शिंदे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादवने मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने या नराधमाला लांब ढकललं आणि घडलेला सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. या घटनेची गंभीर दाखल घेत पीडितेच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, अटकेच्या दुसऱ्याच दिवशी जामीन देखील देण्यात आल्याने संताप व्यक्त केला जातोय. मनसे नेते अविनाश जाधव आणि पीडित मुलीच्या आई-वडिलांनी या आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर, पीडितेच्या कुटुंबियांना धमक्या देखील मिळाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी आता मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. जर दोन दिवसांत त्या नराधमाला अटक केली नाही तर, भंडार आळीपासून ते मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही कॅन्डल मार्च काढू,असं अविनाश जाधव म्हणाले आहेत.