“राज ठाकरे आणि मी या विषयावर एकत्र आलो, तर महाराष्ट्रातील गडकिल्ले………संभाजीराजेंनी स्पष्टचं सांगितलं

0
89

नांदेड, दि. 14 (पीसीबी) : “राज ठाकरे जे बोलतात ते पूर्ण चुकीचं बोलत नाहीत, हे मी मान्य करतो. स्मारकासाठी त्यावेळी 3 हजार कोटी रुपये देतो म्हणले होते. आज ते 15 हजार कोटी रुपये झालेत. उद्या किती होतील?. परवानगी नसताना नरेंद्र मोदी यांना उद्घाटनासाठी बोलावलं, फसवण्याचा प्रकार सुरू आहे” अशी टीका संभाजी राजे भोसले यांनी केली. “गडकोट किल्ल्यांसाठी या 75 वर्षात सत्ताधारी, विरोधकांनी काय केले याचं उत्तर द्या. गड-किल्ले हे जिवंत स्मारकं आहेत, त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. मी सरकारकडे 25 किल्ले दत्तक मागितले आहेत, आम्ही पैसे उभे करतो असं म्हटलं तरी ते द्यायला तयार नाहीत” असं संभाजी राजे म्हणाले. “राज ठाकरे आणि मी या विषयावर एकत्र आलो, तर महाराष्ट्र गड किल्ल्याच्या विषयाला चांगली दिशा देऊ शकतो” असं संभाजी राजे म्हणाले.

विधानसभेला मनसेसोबत एकत्र येणार का? यावरही संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरेंचं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आमचं वेगळ व्यक्तिमत्व आहे, एकत्र येऊ हे नाकारू शकत नाही. राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला हे चांगली गोष्ट आहे. त्यांची ताकद आहे. आमची सुरुवात आहे, म्हणून आम्ही महाशक्ती निर्माण केली आहे, प्रस्थापितांपेक्षा आम्ही विस्थापितांना तिकीट देऊ, प्रस्थापित लोक आले तर त्यांना स्वीकारून सुद्धा. महाशक्तीमुळे वातावरण बदलायला लागलं आहे, चैतन्य निर्माण झालं आहे. त्यांना चांगला पर्याय मिळत आहे” असं संभाजी राजे म्हणाले.

संभाजी राजे यांनी बोलताना अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. “नांदेडमधील एमआयडीसीच उदाहरण घ्या. सगळे लोक पुण्या-मुंबईला जात आहेत. नांदेड मोठे शहर आहे. सगळ्या मोठ् मोठ्या नेत्यांनी जमीन ताब्यात घेतल्या आहेत, कब्जा घेतला आहे. नांदेडमध्ये इंडस्ट्री उभी राहिली नाही. देशाचे नेतृत्व केलेले शंकराव चव्हाण सारखे नेते या ठिकाणी होऊन गेले आहेत. त्यांचे चिरंजीव खासदार आहेत ते मुख्यमंत्री होते, आयुष्यभर ज्या काँग्रेसने त्यांना पोसलं ते स्वतःची नीतिमत्ता सोडून गेले दुसरीकडे. हे चालणार आहे का ? लोक स्वीकारणार आहेत का ? आणि जे घेतात ते सुद्धा सरळ माणसं आहेत का ?” अशी टीका संभाजी राजे यांनी केली. “गोंधळाचा राजकारण सुरू आहे. हा गोंधळ स्वच्छ करायचा असेल तर स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली आहे” असं ते म्हणाले.