लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

0
27

रावेत, दि. 14 (पीसीबी) : अपघात प्रकरण आपसात मिटवून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या रावेतच्या पोलीस हवालदाराला पोलिसांनी रंगेहात अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.११) पुनावळे येथील गंधर्व हॉटेल समोर ही कारवाई केली.

ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय ४४, नेमणूक-रावेत पोलीस ठाणे) असे अटक केलेल्याचे हवालदाराचे नाव आहे. याबाबत एका ५७ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या मुलाचा आणि एक मोटार सायकलस्वार यांच्यात पुनावळे येथे अपघात झाला होता. हवालदार ज्ञानदेव बगाडे यांच्याकडे याबाबतचा तपास होता. या अपघात प्रकरणी जबाब नोंदवून आपसात मिटवून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी बगाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आली. त्याची पडताळणी करताना बगाडे लाच मागत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी पुनवळे येथील गंधर्व हॉटेलसमोर तक्रारदार यांना बोलावले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये स्वीकारताना बगाडे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन बगाडे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक विजय पवार तपास करत आहे.