गरब्यातून बाहेर काढल्यावरून झालेल्या भांडणात एकावर पिस्तुलातून गोळीबार

0
89

महाळुंगे, दि. 14 (पीसीबी) : उद्योगनगरीत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भर गरबा उत्सवात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील महाळुंगे येथे शनिवारी (दि. १२) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. गरब्यातून कॉलर पकडून बाहेर काढल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाच्या छातीत पिस्तुलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता हवेत गोळीबार करून परिसरात दहशत माजवत आरोपी पसार झाले. शहरात गेल्या महिनभरातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे.

निलेश आसाटी (वय ३८, रा. म्हाळुंगे, ता. खेड) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. सौरभ मुळे (वय २७) आणि त्याचे दोन मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज गणपत कदम (वय ३०) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. म्हाळूंगे येथे छावा प्रतिष्ठान मित्र मंडळाच्यावतीने भैरवनाथ मंदिराजवळ नवरात्र उत्सव व दांडीया तसेच गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १२ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम सुरु असताना रात्री सव्वादहाच्या सुमारास सौरभ मुळे याने शंकर नवघणे यांच्या मुलाला गरब्यातून कॉलर पकडून बाहेर काढले. या कारणावरून शंकर नवघणे व सौरभ मुळे यांचे भांडण झाले होते. त्यानंतर थोड्या वेळाने शंकर याची पत्नी व सौरभ यांची आई यांचे त्याठिकाणी भांडण झाले. या भांडणामुळे दांडीयाचा कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यामुळे तेथील महिलांनी सौरभ याच्यासोबत भांडण करून तु बाहेरून येवून आमच्या भागात राहतो आणि आमच्यावर दादागिरी करतो का, असे बोलून त्याला हाताने, चपलांनी मारहाण केली. सौरभला मारहाण केल्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांपैकी एकाने निलेश असाटी याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून असाटी यांच्या छातीत गोळी मारली. यात असाटी हे गंभीर जखमी झाले. सौरभसोबत असलेल्या दुसर्‍या आरोपीने त्यांच्या डोक्यावर विट मारून दुखापत केली. त्यानंतर हवेत गोळीबार करून दहशत माजवत तिघेही पळून गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते तपास करीत आहेत.

महिनाभरातील घटना

गेल्या महिनाभरात पिंपरी – चिंचवड शहरात गोळीबाराची तिसरी घटना घडली आहे. १३ सप्टेंबर रोजी काळेवाडीतील राहुल बार अँड खुशबू या हॉटेलात बसलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद नढे यांच्या रिव्हॉल्वरमधून सराईत गुन्हेगार सचिन नढे याने टेबलवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. तर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी १७ सटेंबर रोजी वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर माथाडीचे काम मिळण्याच्या वादातून सराईत गुन्हेगार बाळा शिंदे (वय ३०, रा. राधाकृष्ण कॉलनी, वाकड) याने दोघांच्या दिशेने गोळीबार केल्याचा प्रकार घडला होता.

’’घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले. आरोपींच्या मागावर पोलीस आहेत. लवकरच त्यांना जेरबंद करण्यात यश येईल.’’ असे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी सांगितले