”मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून…., पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

0
27

छत्रपती संभाजीनगर, दि. 14 (पीसीबी) : छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘आय एंजॉयड धिस लाईफ अॅन्ड बॉडी, आय वॉंट टू रिस्टार्ट’. आय एम नॉट क्विटिंग. लव्ह यू बोथ असे आरशावर मार्करने लिहित पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (ता.13) पहाटे घडल्याची माहिती समोर आली आहे.

साहिल शीलवंत नांदेडकर (वय 17) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. (दि. 12 ऑक्टोबर) रोजी नांदेडकर कुटुंबीयांनी एकत्र दसरा साजरा केला. यावेळी साहिलही या उत्सवात सहभागी झाला होता. त्यावेळी तो आनंदीही होता. त्याने रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत अनेक गोष्टींवर गप्पा देखील मारल्या. नेहमीप्रमाणे सकाळी उपायुक्त नांदेडकर हे 6 च्या सुमारास मॉनिंग वॉकला जाण्यासाठी उठले तेव्हा मुलगा उठला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाच्या रूमचे दार ठोठावले. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी त्यांनी 4-5 वेळा आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसला. त्यांनी तात्काळ कुटुंबातील इतरांना हा घडलेला प्रकार कळवला. साहिलने आत्महत्या का केली असेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत.

दरम्यान, साहिलने हे पाऊल उचलण्यापूर्वी आरशावर ‘मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ असे आरशावर मार्करने लिहिले आहे. त्याने हे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील सर्वच अधिका-यांनी उपायुक्त नांदेडकर यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.